सातारा जिल्हाहोम

‘शाळा क्रमांक ३’चे १०.५५ कोटींच्या ‘स्टार्स’ प्रकल्पांतर्गत भूमिपूजन – पालकमंत्री शंभूराज देसाई

कराड/प्रतिनिधी : –

कराड नगरपालिकेच्या ‘शाळा क्रमांक ३’ने राबवलेले उपक्रम राज्यातील इतर शाळांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत. केंद्र शासनाच्या ‘स्टार्स’ (STARS) प्रकल्पांतर्गत मंजूर झालेल्या १० कोटी ५५ लाख रुपयांच्या या इमारतीचा शुभारंभ आज होत आहे. लवकरच जिल्ह्यातील पालिका शाळांसाठी कार्यशाळा आयोजित करून हे उपक्रम सर्वत्र राबवले जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली.

येथील पालिकेच्या शाळा क्रमांक ३ या राज्यातील आदर्श शाळेच्या तिसऱ्या केंद्र शासनाच्या ‘स्टार्स’ (STARS) प्रकल्पांतर्गत मंजूर झालेल्या १० कोटी ५५ लाख रुपयांच्या या इमारतीचा शुभारंभ पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील होते. यावेळी जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, उपनगराध्यक्ष प्रतापराव साळुंखे, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, तसेच नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री देसाई म्हणाले, राज्यातील आदर्श शाळा म्हणून कराडची ओळख निर्माण झाली आहे. या शाळेत प्रवेशासाठी पालकांची रांग लागते, ही अभिमानास्पद बाब आहे. पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मॉडेल स्कूल या दोन योजनांवर विशेष भर देण्यात आला असून, मराठी शाळांमध्ये सकारात्मक बदल टप्प्याटप्याने घडवले जात आहेत. तसेच, आठवी ते दहावीपर्यंत वर्गवाढीचा प्रस्ताव आल्यास त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

अध्यक्षस्थानावरून बोलताना बाळासाहेब पाटील यांनी, प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. राज्यातील बहुसंख्य नागरिकांचे शिक्षण हे प्राथमिक व नगरपालिका शाळांत झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दर्जेदार शिक्षण देण्यात या शाळांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. कराड हे विद्येचे माहेरघर असून, यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यामुळे येथे अनेक शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या, याची त्यांनी आठवण करून दिली.

नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी, कराड नगरपालिकेच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेताना सांगितले की, ‘शाळा क्रमांक ३’ने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून महाराष्ट्रात कराडचा लौकिक वाढवला आहे. नव्या इमारतीत ३७ सुसज्ज वर्गखोल्या, मीटिंग हॉल, तसेच प्रशस्त सभागृह उभारण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

Related Articles