भारतीय ज्ञानप्रणाली मानवाभिमुख तंत्रज्ञानासाठी उपयुक्त : प्रा. डॉ. आदित्य अभ्यंकर
कृष्णा विश्व विद्यापीठात ‘बायोमेक इन इंडिया’ आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात

कराड/प्रतिनिधी : –
प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेत तर्कशक्ती, निरीक्षण, नैतिकता, समग्र दृष्टीकोन आणि मानवकेंद्रित विचार यांचा समावेश आहे. हीच तत्त्वे आजच्या ए.आय., डेटा सायन्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासासाठी मार्गदर्शक ठरू शकतात. भारतीय ज्ञानप्रणाली केवळ इतिहासाचा भाग नसून, भविष्यातील शाश्वत व मानवाभिमुख तंत्रज्ञानासाठी अत्यंत उपयुक्त आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. आदित्य अभ्यंकर यांनी केले.
कराड येथील कृष्णा विश्व विद्यापीठातील कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ॲन्ड टेक्नॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजिस्ट्स सोसायटी, इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘बायोमेक इन इंडिया–३’ या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कृष्णा विश्व विद्यापीठाचे शैक्षणिक व मानांकन सल्लागार डॉ. प्रविण शिंगारे होते. ‘मानवी कल्याण व शाश्वत नवोन्मेषासाठी भारतीय ज्ञानपरंपरा व आधुनिक विज्ञानाचा संगम’ ही या परिषदेची मुख्य संकल्पना होती.
व्यासपीठावर विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. नीलम मिश्रा, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, संशोधन संचालक निवृत्त ब्रिगेडियर डॉ. जी. हिमाश्री, मायक्रोबायोलॉजिस्ट्स सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अरविंद देशमुख, कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ॲन्ड टेक्नॉलॉजीचे अधिष्ठाता डॉ. गिरीश पठाडे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना प्रा.डॉ. अभ्यंकर पुढे म्हणाले, की योग्य दृष्टीकोन ठेवला तर प्रत्येक घटनेचे सुवर्णसंधीत रूपांतर होऊ शकते. भारतीय ज्ञानपरंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम हाच भविष्यातील संशोधनाचा मार्ग आहे.
डॉ. प्रविण शिंगारे म्हणाले, पूर्वीच्या काळातील मूल्ये जपत आजच्या पिढीला जागतिक स्तरावर सक्षम बनविण्याचा कृष्णा विद्यापीठाचा दृष्टिकोन असून, यासाठी विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले सातत्याने प्रयत्नशील आहेत.
युवकांनी संशोधनातील समस्या व्यावहारिक उपायांत रूपांतरित करून मानव कल्याणासाठी वापराव्यात. तसेच तरुण संशोधकांनी सामाजिक गरजांवर आधारित संशोधनाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा यांनी केले.
डॉ. अरविंद देशमुख यांनी आपल्या भाषणात कराडचा ऐतिहासिक, सांस्कृतिक व भौगोलिक वारसा सांगताना, कृष्णा व कोयना नद्यांचा उल्लेख करून भारतीय ज्ञानपरंपरेचा वैज्ञानिक दृष्टिकोनाशी असलेला संबंध उलगडून सांगितला.
या परिषदेत जैवतंत्रज्ञान, नॅनोसायन्स, पर्यावरण, आरोग्य व शाश्वत विकास आदी विषयांवर भारतीय ज्ञानपरंपरेच्या दृष्टिकोनातून सखोल चर्चा करण्यात आली. यामध्ये मलेशियातील मणिपाल विद्यापीठाच्या डॉ. शर्ली जॉर्ज, नेपाळ येथील डॉ. अंजना सिंग, संशोधिका डॉ. अमृता रंजन, जर्मनीचे डॉ. उलरिच बर्क, चंद्रहास हलई, डॉ. परमानंद बर्मन, डॉ. युगल किशोर मोहंता आदी मान्यवर तज्ज्ञांनी सहभाग नोंदविला.
या परिषदेत ७५० हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाल्याचे सांगून डॉ. गिरीश पठाडे म्हणाले, यामध्ये २०० पेक्षा अधिक पोस्टर सादरीकरणे, ५० हून अधिक मौखिक सादरीकरणे, तसेच विविध नाविन्यपूर्ण संशोधन मॉडेल्सचे सादरीकरण करण्यात आले. या परिषदेमुळे विद्यार्थी व संशोधक विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांशी थेट संवाद, संशोधन प्रकल्पांमध्ये सहभाग आणि नव्या संधी उपलब्ध झाल्याचे त्यांनी नमूद केले.
परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ॲन्ड टेक्नॉलॉजीचे प्राध्यापक, संशोधक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.



