सातारा जिल्हाहोम

शिक्षक व पदवीधर निवडणुकीत जिल्हा निर्णायक भूमिका बजावेल – आमदार डॉ. अतुल भोसले

शिक्षक-पदवीधरांच्या प्रश्न सोडवणुकीसाठी भाजपच्या सेवा अभियानास प्रारंभ

कराड/प्रतिनिधी : –

सातारा जिल्हा आगामी काळात महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभा राहील. शिक्षक व पदवीधर मतदारसंघांमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी जिल्हा निर्णायक भूमिका बजावेल, असा विश्वास भाजपाचे सातारा जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले यांनी व्यक्त केला.

शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील नोंदणीकृत मतदारांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आयोजित बैठकींनंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक संतोष साखरे, क्रांतीअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड साखर कारखाना अध्यक्ष शरद लाड, माजी आमदार भगवानराव साळुंखे, भाजपा पुणे विभाग नोंदणी प्रमुख डॉ. प्रशम कोल्हे, शिक्षक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष बबनराव उकिरडे, पुणे विभाग शिक्षक आघाडीचे प्रा.डॉ. नारायण राजूरवार, सातारा शिक्षक आघाडी अध्यक्ष जयवंतराव माने, मुखाध्यापक महामंडळ पुणेचे उपाध्यक्ष सचिन नलवडे, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, कराड मुखाध्यापक संघ अध्यक्ष संदीप सूर्यवंशी, माजी अध्यक्ष सुधाकर चव्हाण, भाजप कराड दक्षिण शिक्षक आघाडी अध्यक्ष सतीश चव्हाण, भाजपा शिक्षक आघाडी सातारा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सोमदे, विद्यापीठ सिनेट सदस्य अमित कुलकर्णी, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना अध्यक्ष धनाजीराव पाटील उपस्थित होते.

माध्यमांशी संवाद साधताना आमदार डॉ. अतुल भोसले यांनी, शिक्षक व पदवीधर मतदारसंघांतील विविध प्रश्नांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याचे सांगितले. शिक्षकांच्या प्रशासकीय अडचणी, शासकीय धोरणांमधील त्रुटी आणि प्रलंबित विषय लवकर निकाली काढण्यासाठी राज्य पातळीवर पाठपुरावा करण्याबाबत विचारमंथन झाल्याचे त्यांनी नमूद केले.

तसेच येत्या १५ तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंग चौहान सातारा जिल्हा दौऱ्यावर येणार असून, घरकुल मंजूर लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ वितरण करण्यात येणार आहे. देशातील प्रत्येक कुटुंबाला पक्के घर मिळावे, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पपूर्तीकडे एक पाऊल पडणारा हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे आमदार डॉ. अतुल भोसले यांनी सांगितले. महाराष्ट्राला घरकुल योजनेसाठी तिसऱ्या हप्त्याचे अनुदान मिळत असून, या कार्यक्रमासाठी सातारा जिल्ह्याची निवड केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे यावेळी आभारही मानले.

त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना स्वीय सहाय्यक संतोष साखरे म्हणाले, राज्यात नोव्हेंबर-डिसेंबर २०२६ मध्ये होणाऱ्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने संघटनात्मक हालचालींना वेग दिला असून, शिक्षक-पदवीधरांच्या प्रश्नांवर केंद्रित ‘सेवा अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील शिक्षक व पदवीधरांची प्रलंबित शासकीय कामे प्राधान्याने मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल.

श्री. साखरे म्हणाले, शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील नोंदणीकृत मतदारांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत बैठकींचे आयोजन करण्यात येत आहे. या बैठकींतून शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांच्या विविध समस्या समजून घेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावर संघटन अधिक मजबूत करण्यासोबतच मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles