प्रा. डॉ. सुहासकुमार बोबडे यांना ‘उत्कृष्ट ग्रंथ संशोधन पुरस्कार’ जाहीर
'मराठी कवितेतील मानवतावाद' ग्रंथाचा राष्ट्रीय पातळीवरील गौरव; १० मे रोजी बेळगावात सन्मान

कराड/प्रतिनिधी : –
मराठी साहित्य, समीक्षा आणि संशोधन क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. सुहासकुमार बोबडे यांच्या साहित्यसेवेला आणखी एक मानाचा तुरा लाभला आहे. बेळगाव येथील प्रतिष्ठित वाड्.मय चर्चा मंडळाच्या वतीने दिला जाणारा २०२५ सालचा उत्कृष्ट ग्रंथ संशोधन पुरस्कार त्यांच्या ‘मराठी कवितेतील मानवतावाद’ या ग्रंथाला जाहीर करण्यात आला आहे.
मराठी वाड्.मय क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार रविवारी (दि. १०) बेळगाव येथील वरेरकर नाट्यसंघाच्या सभागृहात आयोजित विशेष समारंभात प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कारामध्ये रोख रक्कम रुपये ३ हजार, स्मृतिचिन्ह आणि मानपत्राचा समावेश आहे.
प्रा. डॉ. बोबडे यांनी महिला महाविद्यालय, कराड येथे मराठी विभाग प्रमुख म्हणून प्रदीर्घ काळ अध्यापन करत अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यापनासोबतच त्यांनी साहित्य, भाषा संशोधन, समीक्षा, कथा, कविता, कादंबरी आणि संशोधनपर लेखन अशा विविध साहित्यप्रकारांत उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या नावावर चाळीसहून अधिक ग्रंथ प्रकाशित असून, पुण्यातील नामांकित प्रकाशन संस्थांनी त्यांचे साहित्य प्रकाशित केले आहे.
त्यांच्या अनेक ग्रंथांना राज्य, तसेच आंतरराज्य स्तरावरील विविध साहित्य पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. विशेष म्हणजे “मराठी भाषा : उपयोजन व सर्जन” हा त्यांचा अभ्यासपूर्ण ग्रंथ महाराष्ट्रासह गोवा, धारवाड, बडोदा आणि मॉरिशस विद्यापीठांमध्येही संदर्भग्रंथ म्हणून अभ्यासला जात आहे. त्यामुळे त्यांच्या साहित्यिक आणि संशोधनपर कार्याची व्याप्ती राज्याच्या सीमांपलीकडे पोहोचल्याचे अधोरेखित झाले आहे.
दरम्यान, या उल्लेखनीय यशाबद्दल श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेचे कुटुंबप्रमुख मुनीर बागवान सावकार, चेअरमन राजन वेळापुरे, उपाध्यक्ष अनिल सोनवणे, कार्यलक्षी संचालक विवेक वेळापुरे, अरुण जाधव, डॉ. संतोष मोहिरे, प्रा. अशोककुमार चव्हाण, शरदचंद्र देसाई, सुरेश भंडारी, राजेंद्रकुमार यादव, डॉ. जयवंत सातपुते, निरंजन मोहिरे, श्रीमती जयाराणी जाधव, सिमा विभुते, सुरेश कोळेकर, पारस विजापुरे, तसेच स्व. सौ. वेणूताई चव्हाण स्मृती मराठी साहित्य संमेलनाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रा. डॉ. बोबडे यांचे अभिनंदन करून पुढील साहित्य प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



