सातारा जिल्हाहोम

कराडच्या भूमिपुत्राची जम्मू-काश्मीरमध्ये दमदार कामगिरी

आयपीएस अमोल होमकर यांचा आनंदराव पाटील यांच्या हस्ते सत्कार 

कराड/प्रतिनिधी : –

भारतीय पोलीस सेवेत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत जम्मू-काश्मीरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) जम्मू सेक्टरचे पोलीस महानिरीक्षक (IG) म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे कराडचे भूमिपुत्र अमोल होमकर, IPS यांचा त्यांच्या कराड येथील निवासस्थानी माजी आमदार आनंदराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या भागात महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडत असलेल्या अमोल होमकर यांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. पोलीस सेवेत कार्यरत असताना त्यांनी नक्षलविरोधी मोहिमांमध्येही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. झारखंडमध्ये ‘आयजी ऑपरेशन्स’ म्हणून कार्यरत असताना बुढा पहाड, पारसनाथ यांसारख्या दुर्गम व आव्हानात्मक भागांत त्यांनी नक्षलविरोधी कारवायांचे प्रभावी नेतृत्व केले. त्यांच्या उत्कृष्ट व उल्लेखनीय सेवेची दखल घेत केंद्र सरकारकडून त्यांना पोलीस पदकासह विविध सन्मान प्राप्त झाले आहेत.

दरम्यान, देशातील संवेदनशील मानल्या जाणाऱ्या मणिपूर आणि नागालँड या राज्यांतील सुरक्षा व कायदा-सुव्यवस्था राखण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारीही त्यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. विविध आव्हानात्मक परिस्थितींमध्ये कर्तव्य बजावत त्यांनी आपल्या कार्यक्षमतेची आणि नेतृत्वगुणांची छाप उमटवली आहे.

होमकर यांच्या कर्तृत्वाचा उल्लेख करताना आनंदराव पाटील यांनी, त्यांच्या कुटुंबाशी असलेल्या जुन्या जिव्हाळ्याच्या संबंधांनाही उजाळा दिला. अमोल होमकर यांचे वडील स्व. विनुकांत होमकर यांनी महाराष्ट्र शासनाच्या उत्पादन शुल्क विभागात निरीक्षक म्हणून उल्लेखनीय सेवा बजावली होती. तेव्हापासून होमकर कुटुंबाशी आपले जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे पाटील यांनी सांगितले.

जम्मू-काश्मीरसारख्या संवेदनशील भागात अत्यंत जबाबदारीच्या पदावर कार्यरत असूनही अमोल होमकर यांनी कराडशी असलेला आपुलकीचा संबंध कायम जपला आहे. कराडमधील नागरिक किंवा परिचित जम्मू-काश्मीरमध्ये गेल्यास ‘आपल्या गावचे लोक आले आहेत’ या भावनेतून ते त्यांची विशेष काळजी घेतात. त्यांच्या या जिव्हाळ्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये गेलेल्या अनेक कराडकरांना तेथेही आपलेपणाची भावना मिळते, असे गौरवोद्गार आनंदराव पाटील यांनी व्यक्त केले.

कराडच्या मातीतून घडलेला एक सुपुत्र देशाच्या सुरक्षेची महत्त्वपूर्ण जबाबदारी समर्थपणे पार पाडत असून, त्याची ही वाटचाल संपूर्ण कराडकरांसाठी अभिमानाची बाब आहे. यावेळी आनंदराव पाटील यांनी अमोल होमकर यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles