शाश्वत ऊस उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञान गरजेचे – कृषीभूषण अशोक खोत
जयवंतराव भोसले कृष्णा कृषि महाविद्यालयात शेतकरी दिन उत्साहात साजरा!
कराड/प्रतिनिधी : –
बदलत्या हवामानात आणि घटत्या नैसर्गिक संसाधनांच्या काळात शेतीतील उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी शाश्वत शेती पद्धती आणि शेतीत सेंद्रिय निविष्ठांचा वापर करणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज बनली आहे. विशेषतः ऊस पिकात योग्य पाणी व्यवस्थापन आणि जमिनीची सुपीकता टिकवून ठेवल्यासच शाश्वत ऊस उत्पादन शक्य आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार २०२६ प्राप्त कृषिभूषण अशोक खोत यांनी केले.
येथील जयवंतराव भोसले कृष्णा कृषि महाविद्यालयात पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त ‘शेतकरी दिन’ अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी आयोजित विशेष व्याख्यानात ‘शाश्वत ऊस उत्पादन तंत्रज्ञान’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करताना अशोक खोत बोलत होते. प्राचार्य डॉ. अशोक फरांदे अध्यक्षस्थानी होते.
प्रारंभ पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून झाला. या वेळी ‘भविष्यातील फूल शेती’ या विषयावर कृषीभूषण चांगदेव मोरे यांनीही सखोल मार्गदर्शन केले. यावेळी वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल अशोक खोत यांचा प्राचार्य डॉ. अशोक फरांदे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
प्राचार्य डॉ. अशोक फरांदे यांनी ‘शाश्वत शेतीमधील मातीचे महत्व’ यावर सखोल माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख डॉ. अजित पवार यांनी केली.
आभार डॉ. सारंग कुंभार यांनी मानले, तर सूत्रसंचालन गजानन मोहिते यांनी केले. या प्रसंगी मोठ्या संख्येने शेतकरी, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.


