कालेगावच्या सुपुत्राचा ‘उद्योग रत्न’ पुरस्काराने सन्मान
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते कुमार साळुंखे यांचा गौरव

कराड/प्रतिनिधी : –
कालेगावचे सुपुत्र तथा एस अँड आर जिओटेक्निक्स प्रा. लि.चे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक आणि कॅप्सा ग्लोबल दुबई चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) कुमार सुभाष साळुंखे यांना उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘उद्योग रत्न पुरस्कार २०२६’ने सन्मानित करण्यात आले.
न्यूज 18 मराठी वृत्तवाहिनीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते कुमार साळुंखे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. उद्योग क्षेत्रात सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
कालेगावचे सुभाष साळुंखे (दादा) यांचे ते सुपुत्र असून, दिलीप साळुंखे यांचे पुतणे आहेत. ग्रामीण भागातून उद्योग क्षेत्रात वाटचाल करत त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने व्यावसायिक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
**एस अँड आर जिओटेक्निक्स प्रा. लि.* च्या माध्यमातून जिओटेक्निकल क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी संस्थेच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तसेच कॅप्सा ग्लोबल दुबई च्या माध्यमातूनही ते उद्योग क्षेत्रात कार्यरत असून, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कंपनीच्या विविध उपक्रमांना दिशा देत आहेत.
कुमार साळुंखे यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे कालेगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यांच्या या यशाचे कालेगावसह परिसरातून कौतुक होत असून, ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रपरिवार व हितचिंतकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ग्रामीण भागातील तरुणांनी उद्योग क्षेत्रात पुढे यावे, यासाठी कुमार साळुंखे यांची वाटचाल प्रेरणादायी ठरत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.


