सातारा जिल्हाहोम
Eaayush Man
Send an email
जातीव्यवस्थेच्या निर्मूलनाशिवाय भारताची खरी प्रगती अशक्य – डॉ. शरद गायकवाड
अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या वतीने समाजप्रबोधन मेळावा व सन्मान सोहळा
7 1 minute read
कराड/प्रतिनिधी : –
जातीव्यवस्थेचे निर्मूलन झाल्याशिवाय भारत देश खऱ्या अर्थाने समृद्ध होणार नाही. मानवाने निर्माण केलेली जातिव्यवस्था ही मानवतेच्या मुळावर उठणारी असून अस्पृश्यता हा देशाला लागलेला कलंक आहे. त्यामुळे शिव-शाहू-फुले-आंबेडकरी विवेकी विचारांवर आधारित समाजनिर्मिती करणे, तसेच संविधानाने दिलेल्या अधिकारांचे संरक्षण करणे, ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. शरद गायकवाड यांनी केले.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित १०६ व्या जयंती सोहळ्यातील समाजप्रबोधन मेळावा, सन्मान सोहळा व पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. गायकवाड बोलत होते.
यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ व फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचे प्रचारक ॲड. संभाजीराव मोहिते, युवा भारतचे माजी संचालक कालिदास घाटवळ, ऑल इंडिया धनगर समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश बडेकर, सत्यभामा सौंदरमल आणि समितीच्या अध्यक्षा प्रा. जयमाला साठे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
डॉ. गायकवाड म्हणाले, भांडवलशाही व्यवस्थेकडून सर्वसामान्य गरीब व कष्टकरी समाजाचे शोषण सुरू आहे. समाजातील विषमता दूर करून विवेक, समता आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांवर आधारित समाज उभा करणे आवश्यक आहे. संविधानाने नागरिकांना दिलेल्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने सजग राहिले पाहिजे.
राजेंद्र केरकर यांना जीवनगौरव
पर्यावरण आणि जैविक संपदेच्या संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य करणारे गोव्याचे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र केरकर यांना यंदाचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. फुलेपगडी, मानपत्र आणि शाल देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना केरकर म्हणाले, हा पुरस्कार केवळ माझा नसून सह्याद्रीच्या कुशीत पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे. नेपाळमध्ये घडलेल्या नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर डोंगर, नद्या आणि निसर्गसंपदा सुरक्षित ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. आतापर्यंत सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार यंदा पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तीला देऊन समितीने नवा पायंडा पाडला आहे.
यावेळी सत्यभामा सौंदरमल (माजलगाव), साहिल आरेकर (गुहागर), प्रीतम हतेकर, अमृत भिसे आणि पै. अजय साठे यांना ‘समाजगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रा. डॉ. आनंद साठे यांच्या ‘महाआतंक’ या कवितासंग्रहाला प्रा. हरी नरके स्मृती साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच त्यांच्या ‘श्यू कोणाला सांगायचं नाही!’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमात ॲड. संभाजीराव मोहिते, प्रवीण काकडे, सत्यभामा सौंदरमल आणि साहिल आरेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
समितीच्या अध्यक्षा प्रा. जयमाला साठे यांनी प्रास्ताविक केले. संस्थापक निमंत्रक प्रकाश वायदंडे यांनी कार्यक्रमाची भूमिका मांडली. सूत्रसंचालन अभयकुमार देशमुख यांनी केले. कु. जाई प्रकाश यांनी मानपत्राचे वाचन केले, तर राम दाभाडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रमोद तोडकर, हरी बल्लाळ, अरुण पाटसुपे, आकाराम चव्हाण, सुरज घोलप, जयवंत सकटे, रमेश सातपुते, विजय वायदंडे आणि बापूराव चव्हाण यांनी परिश्रम घेतले.
7 1 minute read



