सातारा जिल्हाहोम

प्रा. चेतन दिवाण यांची महाराष्ट्र मानसिक आरोग्य प्राधिकरणावर तज्ज्ञ सदस्य म्हणून नियुक्ती

कराड/प्रतिनिधी : –

वारुंजी (ता. कराड) येथील सुपुत्र, सामाजिक कार्यकर्ते तथा एकता फ्रेंड्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. चेतन दिवाण यांची महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत महाराष्ट्र मानसिक आरोग्य प्राधिकरणावर तज्ज्ञ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मानसिक आरोग्य क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव, शैक्षणिक पात्रता आणि या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत शासनाने त्यांची तीन वर्षांच्या कालावधीसाठी या महत्त्वपूर्ण प्राधिकरणावर नियुक्ती केली आहे.

मानसिक आरोग्य कायदा २०१७, तसेच केंद्र शासनाच्या २०१८ मधील नियमावलीनुसार स्थापन करण्यात आलेल्या या प्राधिकरणामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच मानसिक आरोग्य, समाजकार्य आणि अन्य संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश आहे. राज्यातील मानसिक आरोग्य संस्थांचे नियमन, त्यांच्या कार्यपद्धती व मानके निश्चित करणे, मनुष्यबळाची उपलब्धता, संस्थांच्या कामकाजाचे नियमन आणि मानसिक आजार असलेल्या व्यक्तींच्या हितासाठी धोरणात्मक निर्णय घेणे, ही या प्राधिकरणाची प्रमुख कार्ये आहेत.

प्रा. चेतन दिवाण यांनी, रांची (झारखंड) येथून मानसिक आरोग्य क्षेत्रातील विशेष अभ्यासक्रम मानला जाणारा ‘एम.फिल. इन सायकियाट्रिक सोशल वर्क’ हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. मानसिक आरोग्य, दिव्यांगत्व आणि समाजकार्य शिक्षण क्षेत्रात त्यांना २२ वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. त्यांच्या याच प्रदीर्घ अनुभवाची आणि तज्ज्ञतेची दखल घेत शासनाने त्यांची मानसिक आरोग्य प्राधिकरणावर नियुक्ती केली आहे.

प्रा. दिवाण यांनी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दिव्यांग अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, सदस्य तसेच विद्या परिषद सदस्य म्हणून काम केले आहे. याशिवाय विद्यापीठाच्या विविध तज्ज्ञ समित्यांवरही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागाच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत समाजकार्य शिक्षण विषय समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या समाजकार्य विषयाच्या SET परीक्षेच्या अध्यक्षपदासह विविध विद्यापीठांच्या अभ्यास मंडळांवर, तज्ज्ञ समित्यांवर, मार्गदर्शक व परीक्षक म्हणूनही प्रा. दिवाण कार्यरत आहेत. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, मुळजी जेठा महाविद्यालय (जळगाव), एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांसह विविध शैक्षणिक संस्थांच्या अभ्यास मंडळांवर त्यांनी योगदान दिले आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या समित्यांवरही ते तज्ज्ञ सदस्य म्हणून कार्यरत आहेत.

प्रा. चेतन दिवाण यांनी, कराड परिसरात पत्रकार म्हणूनही काम केले असून, वारुंजी येथील एकता फ्रेंड्स असोसिएशनच्या माध्यमातून सामाजिक कार्याची परंपरा त्यांनी सातत्याने जपली आहे. सध्या ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न श्रीगोंदा येथील सनराईज समाजकार्य महाविद्यालयाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.

मानसिक आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाला मिळालेली ही शासकीय नियुक्ती म्हणजे वारुंजी तसेच कराड तालुक्याच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. प्रा. चेतन दिवाण यांच्या नियुक्तीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Related Articles