सातारा जिल्हाहोम

कारगिल विजय दिनी कराडमध्ये शहीद जवानांना मानवंदना

कराड/प्रतिनिधी : –

कारगिलच्या बर्फाच्छादित पर्वतरांगांमध्ये भारताच्या शूर जवानांनी दाखविलेल्या अतुलनीय शौर्याची आणि बलिदानाची आठवण जागवित कराडमध्ये कारगिल विजय दिन उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला. विजय दिवस समारोह समितीच्या वतीने विजय चौकातील शहीद स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून कारगिल युद्धातील हुतात्मा जवानांना भावपूर्ण मानवंदना देण्यात आली.

कारगिल युद्धात भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या सैन्याने बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतलेल्या पर्वतशिखरांवर अतुलनीय शौर्याने लढा देत विजय मिळविला. या ऐतिहासिक विजयाची स्मृती जपत दरवर्षी २६ जुलै रोजी कराडमध्ये विजय दिवस साजरा केला जातो. यावेळी पोलीस उपअधीक्षक राजर्षी पाटील यांच्या हस्ते शहीद स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. शहीद जवानांना मानवंदना देताना उपस्थितांनी ‘भारत माता की जय’, ‘जय जवान, जय किसान’ तसेच ‘अमर रहे… अमर रहे… शहीद जवान अमर रहे’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

याप्रसंगी पोलीस उपअधीक्षक राजर्षी पाटील, अॅड. संभाजीराव मोहिते आणि विलासराव जाधव यांनी, कारगिल युद्धातील शूर जवानांच्या पराक्रमाचे स्मरण करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. देशाच्या सीमांचे रक्षण करताना जवानांनी दिलेले बलिदान आणि त्याग प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी वक्त्यांनी सांगितले.

यावेळी विजय दिवस समारोह समितीचे उपाध्यक्ष अरुण जाधव, विनायक विभुते, अॅड. संभाजीराव मोहिते, कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, विलासराव जाधव, नगरसेवक विजय वाटेगावकर, प्राचार्य गणपतराव कनसे, प्रा. बी. एस. खोत, उद्योजक सलीम मुजावर, रत्नाकर शानभाग, प्रा. जालिंदर काशीद, रमेश पवार, प्रा. जालिंदर काशीद, प्रा. सतीश उपळाविकर, सौ. सरोजिनी मोहिते, ऐश्वर्या पाटणकर, महेंद्र भोसले यांच्यासह आजी-माजी सैनिक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विजय दिवस समारोह समितीचे संस्थापक अध्यक्ष कर्नल संभाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून कराडमध्ये कारगिल विजय दिनानिमित्त शहीद जवानांना मानवंदना देण्याची परंपरा जपली जात आहे. शहीद जवानांच्या बलिदानाचे स्मरण करून देशभक्तीची भावना नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य या माध्यमातून केले जात आहे.

Related Articles