सातारा जिल्हाहोम

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे हेच शिक्षणाचे अंतिम ध्येय – सभापती नंदाताई यादव

प्रशिक्षण कार्यशाळा, शिक्षकांच्या योगदानातून तालुक्याची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्याचा निर्धार

कराड/प्रतिनिधी : –

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे हेच शिक्षणाचे अंतिम ध्येय असून, विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाबरोबरच कौशल्य, सर्जनशीलता, सामाजिक जाणीव आणि मूल्यांची रुजवणूक होणे आवश्यक आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने शिक्षकांनी बदलत्या शैक्षणिक प्रवाहांचा स्वीकार करून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सातत्याने स्वतःला अद्ययावत ठेवावे, असे प्रतिपादन कराड पंचायत समितीच्या सभापती सौ. नंदाताई यादव यांनी केले.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार निर्मित शालेय शिक्षण अभ्यासक्रम व पाठ्यक्रम २०२६ अंतर्गत इयत्ता तिसरी व चौथीच्या शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला भेट दिल्यानंतर सौ. यादव बोलत होत्या.सातारा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, डायटचे प्राचार्य जितेंद्र साळुंखे आणि कराड तालुका गटशिक्षणाधिकारी बी. पी. नजी बबनराव मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ शिक्षण विस्ताराधिकारी तथा गट समन्वयक जमिला मुलाणी, केंद्रप्रमुख तथा सातारा जिल्हा गुणवत्ता विकास समितीचे सदस्य गणेश जाधव, प्रशिक्षण समन्वयक व विषयतज्ज्ञ शैलेजा भिसे, अर्चना माने, केशव चौगुले, राजश्री घोडके, देवकांत मॅडम आदी उपस्थित होते.

सौ. यादव म्हणाल्या, समाजाच्या विकासामध्ये शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शिक्षकांचे सातत्यपूर्ण प्रशिक्षण, नवीन शैक्षणिक पद्धतींचा अवलंब आणि विद्यार्थीकेंद्रित अध्यापन यामुळे शिक्षणाची गुणवत्ता निश्चितच उंचावेल. प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षकांना नवे ज्ञान, तंत्रज्ञान आणि अध्यापनाच्या प्रभावी पद्धती आत्मसात करण्याची संधी मिळते. त्यामुळे अशा प्रशिक्षणांचा शिक्षकांनी सकारात्मक दृष्टिकोनातून लाभ घ्यावा.‘स्वच्छता हीच सेवा’ उपक्रम सातत्याने राबविण्याचे आवाहनशाळांमध्ये ‘स्वच्छता हीच सेवा’ हा उपक्रम सातत्याने राबविण्याची गरज असल्याचेही सौ. यादव यांनी सांगितले.

स्वच्छ, सुंदर आणि सकारात्मक शालेय वातावरणाचा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर मोठा परिणाम होतो. त्यामुळे शिक्षणाबरोबरच स्वच्छता, शिस्त आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शिक्षण विस्ताराधिकारी जमिला मुलाणी यांनी, प्रशिक्षणाचे महत्त्व, शिक्षकांची भूमिका, प्रशिक्षणातील उपस्थिती व सक्रिय सहभाग, प्रशासनाची जबाबदारी, तसेच प्रशिक्षणादरम्यान होणाऱ्या संवादाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. प्रशिक्षणादरम्यान शिक्षकांनी विविध विषयांवर चर्चेत सहभाग घेतला. अंकुश नांगरे, महेश लोखंडे, दुल्लन जमादार, मनीषा पवार, राजेंद्र साठे, राजेश पाटील, जितेंद्र रजपूत आदी शिक्षकांनी चर्चेत सक्रिय सहभाग नोंदविला. कराड तालुक्याची शैक्षणिक गुणवत्ता निश्चितपणे उंचावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही शिक्षकांनी सभापती सौ. नंदाताई यादव यांना दिली.

या प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून किरण मोहिते, राजेंद्र पवार, महेश राजमाने, रामेश्वर पाटील, शीतल पाटील, सविता पाटील, शुभांगी मोहिते, विजय वेटम यांनी मार्गदर्शन केले. बीआरसी कर्मचारी तसेच कराड तालुक्यातील इयत्ता तिसरी व चौथीचे शिक्षक-शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रशिक्षणासाठी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजने केलेल्या सहकार्याबद्दल आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार केंद्रप्रमुख गणेश जाधव यांनी मानले.

Related Articles