खोडशी बंधाऱ्याच्या उर्वरित बांधकामासाठी २ कोटी ६४ लाख लाखांचा निधी मंजूर
ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांची घोषणा; आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या पाठपुराव्याची दखल

कराड/प्रतिनिधी : –
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. अतुल भोसले यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत, राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे – पाटील यांनी खोडशी (ता. कराड) येथे कृष्णा नदीवर असलेल्या नवीन गेटेड बंधाऱ्याच्या उर्वरित बांधकामासाठी २ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तसेच हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी रविवारी (ता. २६) कराड दौऱ्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. यामुळे तब्बल ४१ वर्षे रखडलेला खोडशी बंधाऱ्याच्या उर्वरित कामाचा प्रश्न आ.डॉ. अतुल भोसले यांच्यामुळे मार्गी लागला आहे.
खोडशी (ता. कराड) गावाजवळ कृष्णा नदीवर ब्रिटीश कालखंडात सन १८६७ मध्ये जुन्या बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले होते. या बंधाऱ्यामुळे नदीपात्रात मोठा जलसाठा होऊन, या ठिकाणापासून निघणाऱ्या ६४ कि.मी. लांबीच्या कृष्णा कालव्याद्वारे कराड, वाळवा, पलूस व तासगाव तालुक्यामधील सुमारे ८,९७२ हेक्टर एवढे शेती क्षेत्र ओलिताखाली आले आहे. कृष्णा कालव्याद्वारे मिळणाऱ्या पाण्यामुळे हा भाग सुजलाम सुफलाम होण्यास मदत झाली आहे. पण जुन्या बंधाऱ्याचे आयुष्यमान संपत आल्यामुळे १९८५ च्या सुमारास याच नदीपात्रात एका नवीन गेटेड बंधाऱ्याचे बांधकाम सुरु करण्यात आले. ४१ वर्षांचा प्रदीर्घ काळ लोटून देखील हे काम अजूनही अपूर्ण अवस्थेतच असून, या कामाच्या पूर्ततेसाठी आवश्यक निधीची तरतूद करावी, यासाठी आमदार डॉ. भोसले अनेक महिन्यांपासून प्रयत्नशील होते. या निधीसाठी त्यांनी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊनही मागणी केली होती. तसेच राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही याबाबतचा प्रश्न त्यांनी विधीमंडळात उपस्थित केला होता.
आ.डॉ. अतुल भोसले यांनी वेळोवेळी मांडलेल्या या प्रश्नाची गंभीर दखल घेत, राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी रविवारी (ता. २७) थेट कराड दौऱ्यावर येत खोडशी बंधाऱ्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी आ.डॉ. अतुल भोसले यांच्या मागणीला तत्काळ प्रतिसाद देत, बंधाऱ्याच्या उर्वरित कामासाठी २ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी मंजूर करत, हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या निधीमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले हे काम आता लवकरच पूर्णत्वास जाणार आहे. यामुळे सिंचन व्यवस्था अधिक सक्षम होऊन, त्याचा लाभ कराडसह वाळवा, पलूस व तासगाव तालुक्यामधील हजारो शेतकऱ्यांना मिळणार आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात उठविला होता आवाज!
कृष्णा कालव्याद्वारे कराडसह, वाळवा, पलूस व तासगाव तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीला पाणीपुरवठा होत असल्याने, खोडशी बंधाऱ्यांचे विशेष महत्व आहे. पण गेल्या ४१ वर्षांपासून रखडलेल्या बंधाऱ्याच्या उर्वरित कामाच्या निधीसाठी कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले यांनी २५ फेब्रुवारी रोजी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवाज उठविला होता. तसेच वेळोवेळी मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. याची दखल घेत, बंधाऱ्याच्या उर्वरित कामासाठी हा निधी मंजूर झाला आहे.
सिंचनासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या खोडशी बंधाऱ्याच्या उर्वरित कामासाठी जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी २.६४ कोटींचा निधी मंजूर केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. लवकरच या बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले असून, हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने राबविला गेल्यास भविष्यात सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणणे शक्य होणार आहे.
– आ. डॉ. अतुल भोसले



