सातारा जिल्हाहोम

स्मार्ट मीटरविरोधात कराडमध्ये एकजूट  

कराड/प्रतिनिधी : – 

स्मार्ट मीटर बसविल्यानंतर वीजबिलात अनावश्यक वाढ झाल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर कराडमध्ये नागरिकांनी आता संघटितपणे आवाज उठविण्याचा निर्णय घेतला आहे. स्मार्ट मीटरच्या वापराविरोधात नव्हे, तर ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण, वीजबिलातील पारदर्शकता आणि उत्तरदायी वीज वितरण व्यवस्था यासाठी जनजागरणासह कायदेशीर लढा उभारण्यात येणार आहे.

भाजपच्या माजी प्रदेश कार्यकारिणी महिला मोर्चाच्या सदस्या स्वाती पिसाळ यांच्या नेतृत्वाखाली, तसेच ॲड. पद्मजा लाड यांच्या सहभागातून नागरिक, ग्राहक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, अभियंते, तंत्रज्ञ आणि कायदेतज्ज्ञ एकत्र आले आहेत. स्मार्ट मीटर बसविल्यानंतर बिलामध्ये असामान्य वाढ झाल्याचा संशय असलेल्या प्रत्येक प्रकरणाची स्वतंत्रपणे छाननी करून संबंधित ग्राहकांना मोफत मार्गदर्शन व आवश्यक कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

वीज ग्राहकांना Electricity Act-2003, Electricity (Rights of Consumers) Rules-2020, तसेच महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या नियमांनुसार योग्य, अचूक आणि पारदर्शक बिल मिळण्याचा अधिकार आहे. त्यामुळे स्मार्ट मीटरच्या माध्यमातून बिलिंगमध्ये अनियमितता झाल्याचा संशय असल्यास केवळ तक्रार करून थांबायचे नाही, तर संबंधित पुरावे गोळा करून कायदेशीर मार्गाने दाद मागण्याचा निर्धार या अभियानातून व्यक्त करण्यात आला आहे.

प्रत्येक तक्रारीचा स्वतंत्र अभ्यास करून आवश्यक कागदपत्रे व पुरावे संकलित केले जाणार आहेत. त्यानंतर गरजेनुसार ग्राहक तक्रार निवारण मंच (CGRF), वीज लोकपाल, महाराष्ट्र वीज नियामक आयोग, तसेच न्यायालयीन स्तरावरही ग्राहकांच्या वतीने लढा देण्यात येणार आहे. चुकीच्या किंवा संशयास्पद बिलांवर स्वयंचलित पुनरावलोकन यंत्रणा लागू करावी, बिलिंग प्रक्रिया अधिक पारदर्शक करावी, मीटरमधील संभाव्य त्रुटी तातडीने दूर कराव्यात आणि स्मार्ट मीटरमधून उपलब्ध होणारी माहिती ग्राहकांना सहज समजेल अशा स्वरूपात द्यावी, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत.

या अभियानाच्या माध्यमातून गावोगावी जनजागरण मोहीम राबविण्यात येणार असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या अधिकारांची माहिती दिली जाणार आहे. तसेच प्रशासन आणि संबंधित वीज यंत्रणेकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Related Articles