सातारा जिल्हाहोम

नांदगाव व विंग येथे पीएम सूर्यघर योजनेचा आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते शुभारंभ 

कराड/प्रतिनिधी : – 

कराड तालुक्यातील नांदगाव व विंग येथे पी एम सूर्यघर योजनेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या भव्य सोलार प्रकल्पाचे उद्घाटन आमदार अतुल भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मतदारसंघातील तब्बल दहा हजार घरांवर पी एम सूर्यघर योजनेच्या माध्यमातून सुमारे एक ते तीन किलोवॅटचे सोलर प्रकल्प उभारण्याचे काम जोमाने सुरू आहे. या माध्यमातून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ घरगुती ग्राहकांसाठी वीजबिल मुक्त करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

कराड तालुक्यातील नांदगाव व विंग येथे उभारण्यात आलेल्या सौर प्रकल्पांचे उद्घाटन आमदार भोसले यांच्या हस्ते पार पडले. यावेळी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, अधीक्षक अभियंता बाळासाहेब हळनोर, कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते, उपअभियंता स्वप्नील जाधव, कृष्णा कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, पंचायत समिती सदस्य गोविंद गावडे, मंडल अध्यक्ष सीमा साबणे, सरपंच हंबीरराव पाटील, योगेश पाटील, अवधूत इनामदार, हर्षवर्धन मोहिते, सागर पाटील, सर्जेराव थोरात, शंकरराव थोरात, सचिन पाटील, सुशांत मोहिते, अभिजीत कोठावळे, दीपक हजारे, दत्तात्रय माने, तानाजी चौरे, दत्तात्रय थोरात, मारुती मोहिते आदी उपस्थित होते.

याप्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना आमदार भोसले यांनी, या योजनेच्या प्रगतीचा आढावा मांडला. ते म्हणाले, येत्या 30 एप्रिल पर्यंत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सुमारे दीड हजार घरांवर सदर योजनेच्या माध्यमातून सोलार उपकरणे बसवण्यात येणार आहेत. याआधी काही घरांवर चाचणीसाठी सोलार उपकरणे बसवण्यात आली होती, ती यशस्वी झाली असून, संबंधितांना सुमारे १३०० ते २५०० हजार रुपये येणारे वीजबिल आता शून्य रुपयांवर आले आहे. त्यामुळे अशाच पद्धतीने मतदारसंघातील किमान दहा हजार घरांवर सोलार उपकरणे बसवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, केंद्र सरकारची पीएम सूर्यघर योजना कार्यान्वित करण्यासाठी कृष्णा सहकारी बँकेशी निगडित राबवण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाच्या माध्यमातून नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास न होता गतीने हे प्रकल्प पूर्ण झाले पाहिजेत, यासाठी आमचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम चांगल्या प्रकारे सुरू असल्याने त्याचे उल्लेखनीय व दर्जेदार आहे. ही योजना मोठ्या प्रमाणात यशस्वीपणे राबवल्याने कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ राज्यात रोल मॉडेल बनवण्यात आम्ही यशस्वी होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

तसेच यामुळे निश्चितच लगतच्या मतदारसंघातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही योजना राबवून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशभरात एक कोटी घरांवर पीएम सूर्यघर योजना कार्यान्वित करण्याचे स्वप्न लवकरच साकार करणार आहेत. यामध्ये जास्तीत जास्त टक्केवारीनुसार संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ही योजना यशस्वी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

Related Articles