सैनिक कुटुंबांवरील अन्यायाविरोधात माजी सैनिक आक्रमक; एसपी निखिल पिंगळे यांना निवेदन

कराड/प्रतिनिधी : –
सातारा जिल्ह्यात सेवारत सैनिक, माजी सैनिक तसेच शहीद जवानांच्या कुटुंबियांवर वाढत्या अन्यायाच्या घटनांविरोधात माजी सैनिक संघटना आक्रमक झाली असून, या पार्श्वभूमीवर नुकतेच पदभार स्वीकारलेल्या जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन देण्यात आले.
दि. २४ एप्रिल रोजी सातारा येथे सैनिक फेडरेशन व विविध माजी सैनिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत ही भेट घेतली. माजी सैनिक प्रशांत कदम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलिस प्रशासनाचे लक्ष वेधताना जिल्ह्यातील गंभीर घटनांचा आढावा मांडला. यामध्ये खटाव तालुक्यातील चितळी येथील माजी सैनिकाच्या खुनाची घटना, कोरेगाव येथील माजी सैनिकांच्या मुलीचे अपहरण तसेच कराड येथील सेवारत सैनिकाच्या आईच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अपघाताच्या तपासातील विलंबाचा मुद्दा ठळकपणे मांडण्यात आला.
याशिवाय, सैनिक व त्यांच्या कुटुंबियांवर खोटे गुन्हे दाखल होण्याच्या वाढत्या तक्रारी, समाजकंटकांकडून होणारे हल्ले, मारहाण व आर्थिक फसवणुकीच्या घटनांमुळे निर्माण झालेली भीती याबाबतही निवेदनात नमूद करण्यात आले. या सर्व प्रकारांमुळे सैनिक कुटुंबियांना मानसिक त्रास सहन करावा लागत असून, त्यांना तातडीने न्याय मिळावा, अशी ठाम मागणी करण्यात आली.
या निवेदनाची दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी संबंधित प्रकरणांची तात्काळ चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख विशाल घोडके यांचीही भेट घेऊन प्रलंबित प्रकरणांवर चर्चा करण्यात आली.
दरम्यान, शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल सतेश हंगे यांनाही भेटून समस्यांची माहिती दिली. यावर लवकरच माजी सैनिक व संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.
या प्रसंगी शंकर माळवदे (सेना मेडल), राजकुमार शिंदे, प्रवीण शिंदे, संतोष भोसले, गणपत भोसले, हणमंत भोसले, धोंडीराम भोसले, राजाराम भोसले, पोपट भोसले यांच्यासह विविध माजी सैनिक संघटनांचे पदाधिकारी, सेवारत सैनिक व सैनिक कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.


