सातारा जिल्हाहोम

शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या पात्र व्यक्तीपर्यंत पोहोचवा – आ. अतुल भोसले

कराड दक्षिणमध्ये महाराजस्व समाधान शिबिराचा शुभारंभ

कराड/प्रतिनिधी : – 

शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत थेट आणि सुलभपणे पोहोचविण्यासाठी प्रशासनाने अधिक गतिमान व लोकाभिमुख पद्धतीने काम करणे आवश्यक आहे. नागरिकांना शासकीय योजनांसाठी कार्यालयांच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ उपयुक्त ठरत आहे. कराड दक्षिण मतदारसंघात शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचा अभिमान आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. अतुल भोसले यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने विंग (ता. कराड) येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

आ. भोसले म्हणाले, शेतकरी, महिला, युवक तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ शेवटच्या पात्र व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करणे गरजेचे आहे. कराड तालुक्यातील विविध विभागांची कामगिरी समाधानकारक असून, शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. एस.आय.आर. मोहिमेतही प्रशासनाने चांगली कामगिरी केली आहे.

अप्पर जिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार म्हणाले, या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील सुमारे १० लाख नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याचा उद्देश आहे. सातारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळावा तसेच एकही पात्र व्यक्ती वंचित राहू नये, यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.

शिबिरात नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. तसेच विविध योजनांशी संबंधित १ हजार ६५० दाखल्यांचे वितरण करण्यात येणार आहे.

यावेळी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, उपनिबंधक अर्चना यादव, जि. प. सदस्य शैलजा शिंदे, प्रियांका साळुंखे, पंचायत समिती सभापती नंदाताई यादव, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, मलकापूरचे मुख्याधिकारी कपिल जगताप, सरपंच दिपाली पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles