मलकापुरात ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा

कराड/प्रतिनिधी : –
वाचनसंस्कृतीला चालना देत गेल्या ३४ वर्षांपासून ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या मलकापूर येथील समाज प्रबोधन सार्वजनिक वाचनालयाचा ३४ वा वर्धापनदिन, तसेच ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा करण्यात आला. वाचनालयाच्या सभागृहात मान्यवर, संचालक, सभासद, वाचक आणि परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष शेतीमित्र अशोकराव थोरात यांनी, वाचनसंस्कृती रुजविण्यामागील भूमिका स्पष्ट केली. ‘वाचाल तर वाचाल’ या विचाराला प्रत्यक्ष कृतीची जोड देत १९९२ मध्ये सुरू केलेले हे छोटे रोपटे आज वटवृक्षात रूपांतरित झाल्याचे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले. ‘पुस्तकाने मस्तक सुधारते’ या विचारातून मलकापूर व परिसरातील वाचकांसाठी वाचनालयाची मुहूर्तमेढ रोवण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रसन्न थोरात यांनी, ग्रंथालय हे केवळ पुस्तकांचे भांडार नसून स्वप्नांना पंख देणारे आणि भविष्य घडविणारे ज्ञानमंदिर आहे, असे प्रतिपादन केले. बदलत्या काळातही वाचनालयांची भूमिका महत्त्वाची असून नव्या पिढीला वाचनाकडे वळविण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रंथपाल वैशाली शेवाळे यांनी, प्रास्ताविकातून डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या कार्याची माहिती देतानाच समाज प्रबोधन सार्वजनिक वाचनालयाच्या ३४ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. यावेळी कोमल पवार, मनीषा सूर्यगंधा आणि आनंदराव चव्हाण यांनी मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमास वाचनालयाचे सचिव विशांत थोरात, उपाध्यक्षा सुरेखा खंडगळे, सर्व संचालक व सदस्य, आनंदराव चव्हाण विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. पी. फराळे, आदर्श प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्योती शिंदे, स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका लता जाधव, न्यू इंग्लिश स्कूल कासारशिरंबेचे मुख्याध्यापक मोहिरे, पत्रकार आनंदराव पवार यांच्यासह मलकापूर परिसरातील ग्रामस्थ व वाचक सभासद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक वैशाली शेवाळे यांनी केले. कार्यक्रमासाठी सुरेखा खंडगळे यांचे मार्गदर्शन लाभले. कोमल पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छाया माने यांनी सहकार्य केले.



