मनोरंजनमहाराष्ट्रसातारा जिल्हाहोम

शहापूर सोसायटीचा ठराव घोरपडे गटाच्या पारड्यात

बाळासाहेब पाटील गटाला राजकीय धक्का; ८ विरुद्ध ४ मतांनी ठराव मंजूर, सोसायटी पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

कराड/प्रतिनिधी : –

तालुक्यातील शहापूर विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी करण्यात येणारा ठराव आमदार मनोज घोरपडे यांच्या गटाच्या पारड्यात गेला. सोसायटीचे चेअरमन सर्जेराव चव्हाण यांच्या नावाने हा ठराव ८ विरुद्ध ४ मतांनी मंजूर झाला. या घडामोडीमुळे शहापूरमध्ये आमदार घोरपडे गटाला बळ मिळाले असून, माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या गटासाठी हा राजकीय धक्का मानला जात आहे.

शहापूर हे बाळासाहेब पाटील यांच्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील महत्त्वाचे गाव मानले जाते. त्यामुळे विकास सेवा सोसायटीचा ठराव आपल्या बाजूने वळविण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून दोन्ही गटांकडून मोर्चेबांधणी सुरू होती. अखेर सोसायटीच्या ठरावाच्या माध्यमातून घोरपडे गटाने येथे आपले राजकीय वर्चस्व दाखवून दिल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात आला.

आमदार मनोज घोरपडे यांचे विश्वासू सहकारी आण्णासो जाधव, माजी उपसरपंच बाबा पाटील, कृष्णत शेलार आणि युवा नेते दत्तात्रय शेलार यांच्यासह स्थानिक कार्यकर्त्यांनी यासाठी प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले. ठराव मंजूर झाल्यानंतर सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन व सदस्यांनी आमदार मनोज घोरपडे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी सोसायटीच्या पदाधिकारी व सदस्यांनी भारतीय जनता पक्षात आमदार घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला. शहापूरच्या विकासासाठी यापुढे आमदार घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी आण्णा जाधव, निलेश शेडगे आणि दत्तात्रय जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. आमदार मनोज घोरपडे यांनी, सर्वांचे अभिनंदन करून शहापूरच्या विकासासाठी आगामी काळात निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे आश्वासन दिले.

दरम्यान, आमदार घोरपडे यांच्या माध्यमातून अल्पावधीत शहापूरसाठी विविध विकासकामांना निधी मिळाल्याने ग्रामस्थांचा कल त्यांच्या नेतृत्वाकडे वाढल्याचा दावा सोसायटीचे चेअरमन सर्जेराव चव्हाण यांनी केला. आगामी काळात शहापूरकर आमदार घोरपडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या घडामोडीत माजी चेअरमन दादा जाधव, राजाराम जगदाळे, शिवाजी जाधव, आण्णा जाधव, प्रशांत जाधव, विष्णू शिरतोडे, भास्कर पाटील, तानाजी जाधव, पोपट शिरतोडे, दर्शन जाधव, पृथ्वीराज चव्हाण, दुर्वास कुंभार, भानुदास पवार, गोरख शिंदे, शिवाजी सूर्यवंशी, निलेश शेडगे, तानाजी पाटील, चंद्रकांत नलवडे, समाधान पवार, प्रविण शिरतोडे, दत्ता भोसले, तानाजी जाधव, सुधीर चव्हाण, प्रमोद मुंद्रळकर, कृष्णत नामदास, राजेंद्र शेलार, अनिल जाधव, कृष्णत चव्हाण, सदाशिव शेलार, अमृत चव्हाण, दत्तात्रय जाधव, गोविंद पवार, प्रशांत जाधव आदींचा सहभाग असल्याचे सांगण्यात आले.

Related Articles