प्रविण पाटील यांचा प्रामाणिकपणाबद्धल बाजार समितीत सत्कार
सापडलेले पैशांचे पाकीट केले परत; सीसीटीव्हीच्या आधारे पाकिटाच्या मालकाचा शोध

कराड/प्रतिनिधी : –
रस्त्यात किंवा सार्वजनिक ठिकाणी सापडलेली वस्तू स्वतःकडे न ठेवता ती संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचा प्रामाणिकपणा आजही समाजात जिवंत असल्याचे उदाहरण कराड शेती उत्पन्न बाजार समितीतील कर्मचारी प्रविण पाटील यांनी घालून दिले. सापडलेले पैशांचे पाकीट प्रामाणिकपणे बाजार समितीकडे जमा करून ते त्याच्या मालकाला परत मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल बाजार समितीच्या वतीने त्यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कराड येथील स्वा. सै. शामराव पाटील भाजीपाला मार्केटमधील जनावरे बाजार आवारातील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या शरद पवार (रा. कार्वे नाका, कराड) यांचे पैशांचे पाकीट हरवले होते. हे पाकीट बाजार समितीचे पेट्रोल पंप विभागातील कर्मचारी प्रविण पाटील यांना सापडले. त्यांनी कोणताही विलंब न करता ते पाकीट पेट्रोल पंप विभागाचे प्रमुख जगताप यांच्याकडे जमा केले.
दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर सदर पाकीट शरद पवार यांचे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पवार यांना बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात बोलावून त्यांच्या पैशांसह पाकीट सुरक्षितपणे त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. प्रविण पाटील (रेठरे खुर्द) दाखविलेल्या प्रामाणिकपणाचे कौतुक करत बाजार समितीचे सभापती सतीशराव इंगवले, माजी सभापती विजयकुमार कदम, संचालक राजेंद्र चव्हाण, जगन्नाथ लावंड, सर्जेराव गुरव, सचिव आबासो पाटील, तसेच सर्व सेवक यांच्या उपस्थितीत पाटील यांचा सत्कार करण्यात आला.



