डॉ. सुरेश भोसले यांना ‘साखर उद्योग गौरव पुरस्कार’ जाहीर
डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्ट्स असोसिएशनकडून सन्मान

कराड/प्रतिनिधी : –
रेठरे बुद्रुक (शिवनगर), ता. कराड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांना साखर उद्योगातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्ट्स असोसिएशनचा प्रतिष्ठित ‘साखर उद्योग गौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. सहकार क्षेत्र, साखर उद्योग आणि शेतकरी हितासाठी त्यांनी केलेल्या दूरदृष्टीपूर्ण आणि उत्कृष्ट नेतृत्वाची दखल घेऊन त्यांना हा बहुमान प्रदान करण्यात येत आहे.
डॉ. सुरेश भोसले यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याने तांत्रिक, आर्थिक आणि प्रशासकीय क्षेत्रात सातत्याने नवनवीन उच्चांक गाठले आहेत. ‘कृष्णा’ कारखान्याचे अध्यक्षपद भूषवताना त्यांनी कारखान्याला तांत्रिक व आर्थिक शिस्त लावली आहे. सहकार क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कारखान्याला राज्यात अव्वल स्थानी पोहोचवले आणि सभासदांना नेहमीच उच्चांकी ऊस दर दिला आहे.
यासोबतच आधुनिक उपपदार्थ निर्मिती प्रकल्पांच्या माध्यमातून कारखान्याला भक्कम आर्थिक स्थिरता मिळवून दिल्याने कृष्णा कारखान्याचा प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावत राहिला आहे. सहकारातील वाढत्या स्पर्धेच्या काळातही तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाचा उत्तम मेळ घालत त्यांनी कारखान्याला नेहमीच अग्रस्थानी ठेवले आहे.
शेतकऱ्यांप्रती असलेली त्यांची बांधिलकी आणि कारखान्याच्या प्रगतीसाठीची दूरदृष्टी यामुळे हा पुरस्कार अत्यंत गौरवास्पद मानला जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याला यापूर्वीही वसंतदादा शुगर्स इन्स्टिट्यूटकडून २०१९-२० चा दक्षिण विभागात तृतीय क्रमांकाचा तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार, वसंतदादा शुगर्स इन्स्टिट्यूटचा २०२०-२१ चा प्रथम क्रमांकाचा तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार, वसंतदादा शुगर्स इन्स्टिट्यूटकडून प्रतिष्ठेचा २०२२-२३ चा कै. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार आणि २०२४-२५ मध्ये सन २०२२-२३ च्या गळीत हंगामासाठी वसंतदादा शुगर्स इन्स्टिट्यूटकडून दक्षिण महाराष्ट्र विभागातील सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.
यासोबतच देशातील साखर उद्योगात अग्रगण्य असणाऱ्या भारतीय शुगर संस्थेकडून २०२१-२२ चा सर्वोत्कृष्ट ऊस विकासाचा राष्ट्रीय पुरस्कार, २०२२-२३ चा सर्व विभागांतील उत्कृष्ट कार्यक्षमता व गुणवत्तेचा पुरस्कार व सर्वोत्कृष्ट डिस्टिलरीचा राष्ट्रीय पुरस्कार, तसेच राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाकडून २०२४-२५ चा उच्च तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. या सर्वोत्कृष्ट पुरस्कारांच्या उज्ज्वल परंपरेत आता डॉ. सुरेश भोसले यांना हा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे कारखान्याचे संचालक मंडळ, सभासद, शेतकरी वर्ग, कामगार आणि सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.



