सातारा जिल्हाहोम

कराड उत्तरमधील नागरिकांच्या प्रश्नांना त्वरित न्याय – आमदार मनोज घोरपडे

महाराजस्व समाधान शिबिरात 15 महसूल सेवा, शेकडो नागरिकांना लाभ

कराड/प्रतिनिधी : –

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचे महसूल विषयक प्रश्न एकाच ठिकाणी मार्गी लावण्यासाठी आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रश्नांना त्वरित न्याय मिळाला आहे. यापूर्वीही गत दीड वर्षात कराड उत्तर मतदारसंघात सुमारे 21 जनता दरबार घेऊन सर्वसामान्य लोकांचे प्रलंबित प्रश्न मार्गस्थ केले आहेत. यापुढेही कराड उत्तर मतदारसंघातील तळागाळातील सर्वसामान्य लोकांचे जीवन सुसह्य होण्यासाठी सदैव कटिबद्ध राहू, असे प्रतिपादन आमदार मनोज घोरपडे यांनी केले.

मसूर, ता. कराड येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती याचे औचित्य साधून आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, पंचायत समिती सभापती नंदाताई यादव, उपसभापती अनिता वेताळ, जिल्हा परिषद सदस्य लालासाहेब जगदाळे, पं.स. सदस्य डॉ. संतोष पाटील, कोमल यादव, धैर्यजा माने, संग्राम पवार, प्रदीप साळुंखे, संपतराव इंगवले,बाजार समिती सभापती संतोष इंगवले आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अप्पर जिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार यांनी, लोककल्याणकारी शासकीय योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध राहील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी लालासाहेब जगदाळे, नंदाताई यादव, डॉ. संतोष पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी केले. सूत्रसंचालन दिपाली बामणे व बाजीराव पाटील यांनी केले. आभार तहसीलदार कल्पना ढवळे यांनी मानले. कार्यक्रमास प्रशासनाच्या विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles