माजी सैनिकांसाठी ‘झिरो बॅलन्स’ पेन्शन खाते
ICICI बँकेचा विशेष उपक्रम; विमा संरक्षणासह विशेष बँकिंग सुविधांचा लाभ

कराड/प्रतिनिधी : –
माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय, तसेच शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी बँकिंग सुविधा अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने ICICI Bank ने महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. भारतीय सेना व PCDA यांच्यासोबत झालेल्या सामंजस्य कराराच्या (MOU) पार्श्वभूमीवर माजी सैनिकांसाठी ‘झिरो बॅलन्स DSP पेन्शन अकाउंट’ सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती बँकेच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
सातारा येथील ICICI बँकेच्या मुख्य शाखेत बँकेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख अधिकारी आणि सैनिक फेडरेशन माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी उपलब्ध होणाऱ्या विविध बँकिंग सुविधा, पेन्शन खाते तसेच विमा संरक्षणाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
नवीन DSP पेन्शन खात्यामध्ये झिरो बॅलन्सची सुविधा असून, त्यासोबत विमा संरक्षणासह विविध विशेष बँकिंग सेवा उपलब्ध होणार आहेत. माजी सैनिकांना पेन्शन व्यवहार अधिक सोयीस्करपणे करता यावेत तसेच त्यांच्या कुटुंबीयांनाही बँकिंग सेवांचा लाभ सहज मिळावा, या उद्देशाने ही सुविधा महत्त्वाची ठरणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
या योजनेची कार्यपद्धती, उपलब्ध सुविधा आणि माजी सैनिकांना मिळणारे लाभ याबाबत बँक अधिकाऱ्यांनी सैनिक फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांना सविस्तर माहिती दिली. या उपक्रमामुळे सातारा जिल्ह्यातील माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय आणि शहीद जवानांच्या कुटुंबीयांना बँकिंग सेवा अधिक सुलभ व सुविधाजनक होण्यास मदत होणार आहे.
बैठकीस सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्याचे प्रशांत कदम, जिल्हा सचिव डॉ. संजय लावंड, सातारा तालुका अध्यक्ष प्रवीण शिंदे, खटाव तालुका अध्यक्ष रामचंद्र इंगळे, कॅप्टन संतोष धुमाळ, अनिल शिंदे, आनंदराव शिंगाडे आणि अमीर शिंदे उपस्थित होते.



