Uncategorizedसातारा जिल्हाहोम

भिमशक्तीचा १५ ऑगस्टला पालिकेसमोर आंदोलनाचा इशारा

उर्दू शाळेच्या जागेवरून वाद; संविधान भवनाच्या बांधकामावरही आक्षेप

कराड/प्रतिनिधी : – 

शहरातील बाराडबरे परिसरातील कचरा डेपोच्या लगत सुमारे १ कोटी ६ लाख रुपये खर्चून प्रस्तावित असलेल्या उर्दू शाळेच्या जागेवरून, तसेच सुमारे ६७ लाख रुपये खर्चाच्या संविधान भवनाच्या बांधकामावरून कराड पालिका प्रशासनावर भिमशक्ती सामाजिक संघटनेने आक्षेप घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळेसाठी पर्यायी जागा निवडावी आणि संविधान भवनाचे बांधकाम नियमांनुसार करावे, अशी मागणी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक आनंदराव लादे यांनी केली. या मागण्यांसाठी दि. १५ रोजी पालिकेसमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या संदर्भात शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत लादे यांनी पालिकेच्या प्रस्तावित कामांबाबत भूमिका मांडली. यावेळी आखिल आंबेकरी, रविंद्र बेंद्रे, आसिफ मुलाणी, अमजद आंबेकरी, प्रा. श्रीरंग पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

बाराडबरे परिसरातील कचरा डेपोला वारंवार आग लागण्याच्या घटना घडत असून, त्यामुळे परिसरातील नागरिकांना धूर आणि दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असल्याचा दावा लादे यांनी केला. परिसरातील अन्य दोन प्रकल्पांमुळेही दुर्गंधीचा प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत स्थानिक नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या असतानाही कचरा डेपोच्या नजीकच उर्दू शाळेचे बांधकाम प्रस्तावित करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भूमिका त्यांनी मांडली. शाळा बांधकामासाठी लागू असलेल्या नियम व न्यायालयीन निर्देशांचा विचार करून पालिका प्रशासनाने योग्य जागेची निवड करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, बाराडबरे परिसरात सुमारे सहा गुंठे जागेत ६७ लाख रुपयांच्या निधीतून संविधान भवनाचे बांधकाम सुरू असल्याबाबतही यावेळी आक्षेप नोंदविण्यात आला. कचरा डेपोच्या लगत असलेला पालिकेचा कोंडवाडा पाडून, तसेच ४० फूट रुंदीच्या रस्त्याच्या जागेत सुमारे २० फूट अतिक्रमण करून बांधकाम सुरू असल्याचा आरोप आखिल आंबेकरी यांनी केला. या कामाची पालिका प्रशासनाने पाहणी करून नियमांची पूर्तता झाली आहे का, याची स्पष्टता करावी, अशी मागणी करण्यात आली. उर्दू शाळा आणि संविधान भवनाच्या कामाबाबत उपस्थित करण्यात आलेल्या आक्षेपांची पालिका प्रशासनाने दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

Related Articles