आर्वी विकास सोसायटीत जिल्हा बँकेच्या ठरावावरून राजकीय भूकंप!
बाळासाहेब जाधव यांच्या नावाचा ठराव बिनविरोध; आमदार मनोज घोरपडे समर्थकांची बाजी

कराड/प्रतिनिधी : –
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठरावाच्या राजकारणाने जिल्ह्यातील सहकारी संस्थांमधील राजकीय समीकरणे ढवळून निघाली असतानाच कोरेगाव तालुक्यातील आर्वी विकास सेवा सोसायटीतही मोठी राजकीय घडामोड घडली आहे. जिल्हा बँकेच्या ठरावासाठी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत बाळासाहेब जाधव यांच्या नावाचा ठराव बिनविरोध मंजूर झाला. त्यामुळे आर्वीच्या स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
आर्वी विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद निर्माण झाले होते. त्यानंतर राष्ट्रवादीच्या एका गटाने भाजपच्या स्थानिक गटाशी हातमिळवणी करून निवडणूक लढवली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सात, तर भाजपचे सहा संचालक विजयी झाले. त्यानंतर पवन जाधव यांची चेअरमनपदी, तर मीराबाई जगदाळे यांची व्हाईस चेअरमनपदी निवड झाली होती.मात्र, जिल्हा बँकेच्या ठरावाचा मुद्दा पुढे आल्यानंतर या संचालक मंडळातील राजकीय समीकरणांना अचानक कलाटणी मिळाली.
ठरावाच्या पार्श्वभूमीवर सोसायटीचे सहा संचालक गेल्या काही दिवसांपासून संपर्काबाहेर असल्याची चर्चा आर्वीसह परिसरात रंगली होती. त्यामुळे ठराव नेमका कोणाच्या बाजूने होणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत बाळासाहेब जाधव यांच्या नावाचा जिल्हा बँकेसाठीचा ठराव बिनविरोध मंजूर करण्यात आला. त्यामुळे ठरावाच्या राजकारणात आमदार मनोज घोरपडे यांच्या समर्थक गटाने बाजी मारल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
दरम्यान, चेअरमन पवन जाधव, व्हाईस चेअरमन मीराबाई जगदाळे यांच्यासह बाळासाहेब जाधव, विकास जाधव, मच्छिंद्र चव्हाण, एकनाथ यादव आणि उद्धव पवार या संचालकांनी आमदार मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची भूमिका जाहीर केल्याचे सांगण्यात आले. आमदार घोरपडे यांचे समर्थक श्रीकांत माळी यांनी या घडामोडीत महत्त्वाची भूमिका बजावल्याची चर्चा आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी विविध विकास सेवा सोसायट्यांमधून होणाऱ्या ठरावांवरून जिल्हाभरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यातच आर्वी विकास सोसायटीतील ठरावाने स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची नांदी झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. आगामी काळात या घडामोडींचा स्थानिक राजकीय समीकरणांवर नेमका काय परिणाम होतो, याकडे आता परिसराचे लक्ष लागले आहे.



