यशवंतराव चव्हाण कृषी महाविद्यालयात ‘समता कथा’ अन् ‘समता दौड’ उत्साहात

कराड/प्रतिनिधी : –
समता ही केवळ विचारांची संकल्पना न राहता ती आपल्या आचरणातून आणि कृतीतून दिसली पाहिजे, हाच महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचा गाभा आहे. त्यांच्या समतेच्या, शिक्षणाच्या आणि सामाजिक न्यायाच्या विचारांना कृतीची जोड देण्याचा संदेश देत यशवंतराव चव्हाण शासकीय कृषी महाविद्यालयात ‘समता कथा’ आणि ‘समता दौड’ उपक्रम उत्साहात पार पडले.
महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंती शताब्दी वर्षानिमित्त आयोजित ‘समता कथा’मध्ये विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनकार्याचा विविध पैलूंनी वेध घेतला. हर्षवर्धन सुतार, दिव्या जाधव व सहकाऱ्यांनी फुले यांचे सामाजिक कार्य, सत्यशोधक समाजाची स्थापना, शेतकऱ्यांसाठीचे योगदान आणि सामाजिक न्यायाचा विचार मांडला. तर अर्थव हिप्परकर व सहकाऱ्यांनी १८४८ मध्ये पुण्यात सुरू झालेल्या मुलींच्या पहिल्या शाळेसह सावित्रीबाई फुले यांच्या स्त्रीशिक्षणातील योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. संग्राम धुमाळ होते. ‘शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे,’ हा महात्मा फुले यांचा विचार आजही तितकाच मार्गदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी फुले यांच्या समता, शिक्षण व सामाजिक न्यायाच्या विचारांतून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी कार्यरत राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्याचीही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. शिक्षण, विज्ञान आणि राष्ट्रसेवेच्या माध्यमातून त्यांनी दिलेल्या योगदानातून प्रेरणा घेण्याचे आवाहन डॉ. धुमाळ यांनी केले.
यानंतर महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून कृषी संशोधन केंद्रापर्यंत ‘समता दौड’ घेण्यात आली. प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत समतेचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. कैलास काळे यांनी केले. सूत्रसंचालन साक्षी घनवट व अक्षता खाडे यांनी केले. डॉ. परिमल कचरे यांनी आभार मानले. विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. स्नेहल गादेवाड, डॉ. नंदकिशोर टाले यांच्यासह महाविद्यालय व कृषी संशोधन केंद्रातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संबंधितांनी विशेष परिश्रम घेतले.



