शिवकालीन पाणंद रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात
न्यायासाठी ग्रामस्थांचे उपोषण; वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कारवाईस टाळाटाळ

कराड/प्रतिनिधी : –
कोयनावसाहत ग्रामपंचायत हद्दीतील ऐतिहासिक शिवकालीन पाणंद रस्त्यावर झालेल्या कथित अतिक्रमणामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असून, प्रशासनाच्या दिरंगाईविरोधात ग्रामस्थांनी उपोषण सुरु केले आहे. या संदर्भात काकासो ऊर्फ संजय शिवराम चव्हाण यांनी तहसीलदार कल्पना ढवळे यांच्याकडे निवेदन सादर करून तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, कोयनावसाहत येथील उत्तर-दक्षिण जखिणवाडी रोड, घुणकी, मातोश्री पतसंस्था, डी-मार्ट ते म्हसोबा चौक असा जाणारा शिवकालीन पाणंद रस्ता ग्रामपंचायतीच्या अभिलेखातील नमुना क्रमांक २३ मध्ये नोंद असून, हा रस्ता सुमारे १७१० फूट लांब आणि ३३ फूट रुंद आहे. या मार्गावरून परिसरातील शेकडो नागरिकांची दररोज वर्दळ असते. मात्र, रस्त्यालगतच्या काही हिस्सेदारांनी सुमारे ४०० मीटर लांबी आणि १३ फूट रुंदीपर्यंत अतिक्रमण केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे रस्त्याची रुंदी कमी होऊन वाहतूक कोंडी निर्माण होत असून, वाहनधारक व नागरिकांना रोजच त्रास सहन करावा लागत आहे. किरकोळ कारणांवरून वाहनचालकांमध्ये वादविवादही होत असल्याने सामाजिक सलोखा धोक्यात येत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकरणी कोयनावसाहत ग्रामपंचायतीने सप्टेंबर २०२५ मध्ये तहसील कार्यालयाकडे छत्रपती शिवाजी महाराज अभियानांतर्गत अतिक्रमण हटविण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर जानेवारी २०२६ मध्ये स्मरणपत्रही देण्यात आले. तसेच चव्हाण यांनी, एप्रिल २०२६ मध्ये आवश्यक कागदपत्रे व पुरावे जोडून स्वतंत्र निवेदन सादर केले होते. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
प्रशासनाकडून वारंवार पाठपुरावा करूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने ग्रामस्थांसह मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच उपोषणादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही देण्यात आला आहे. शिवकालीन पाणंद रस्ता अतिक्रमणमुक्त करून नागरिकांसाठी खुला करण्यात यावा आणि या प्रकरणी तातडीने न्याय मिळावा, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.


