सातारा जिल्हाहोम

मारूल हवेली येथे विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात 

कराड/प्रतिनिधी : – 

मारूल हवेली (ता.पाटण) येथील श्री सिद्धेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाच्या वातावरणात पार पडले. मंदिराच्या विकास व सुशोभीकरणासाठी करण्यात आलेल्या कामांचे लोकार्पण यावेळी करण्यात आले.

माजी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या मार्गदर्शनातून व देणगीतून सिद्धेश्वर पिंडीचा वज्रलेप करण्यात आला असून पिंडीस नवे पितळेचे कवच बसविण्यात आले. याशिवाय श्री पार्वती, श्री दत्त यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना, गाभाऱ्याचे सुशोभीकरण तसेच प्रवेशद्वाराचे नूतनीकरण करण्यात आले. कार्यक्रमानिमित्त होमहवन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रीनिवास पाटील यांच्यासह सनबीम शिक्षण समूहाचे अध्यक्ष सारंग पाटील, मिरज संस्थानचे युवराज श्रीमंत माधवराजे पटवर्धन, युवराणी श्रीमंत आनुसयाराजे पटवर्धन तसेच सौ.रचनादेवी पाटील, अंशुमन पाटील उपस्थित होते.

दरम्यान, पुरातन मूर्तींचे वज्रलेपाद्वारे पुनर्जतन करणारे मुर्तीकार प्रसाद परब यांनी झीज झालेल्या पिंडीचे पुनरुज्जीवन करून तिला मूळ स्वरूप प्राप्त करून दिले आहे. सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी दिसून आली. मारूल गावासह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले व धार्मिक विधींमध्ये सहभागी होत भक्तिभाव व्यक्त केला.

Related Articles