कोपर्डे हवेलीतील ‘ब सत्ता’ रद्दीकरणाला वेग – आमदार मनोज घोरपडे यांच्या पाठपुराव्याला यश

कराड/प्रतिनिधी : –
कराड उत्तर मतदारसंघातील कोपर्डे हवेली (ता. कराड) येथील गावठाण हद्दीत गेल्या चार दशकांपासून प्रलंबित असलेला ‘ब सत्ता’ प्रकार अखेर रद्द होण्याच्या मार्गावर आला आहे. आमदार मनोज घोरपडे यांच्या सातत्यपूर्ण आणि आक्रमक पाठपुराव्यामुळे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीने अहवाल मागवून प्रक्रिया गतिमान केली आहे.
या घडामोडीमुळे स्थानिक ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. कोपर्डे हवेली गावात सन १९८२ मध्ये नगर भूमापन योजना राबविण्यात आली होती. मात्र, त्या वेळी झालेल्या तांत्रिक त्रुटींमुळे गावठाणातील अनेक पारंपरिक मिळकतींना ‘ब सत्ता’ (नियंत्रित सत्ताप्रकार) अशी नोंद देण्यात आली.
प्रत्यक्षात या जमिनींवर अनेक पिढ्यांपासून कुटुंबांचा ताबा असूनही, या नोंदीमुळे नागरिकांना मालमत्तेचे व्यवहार, कर्जप्रक्रिया, तसेच बांधकाम परवानग्या मिळवताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.
या संदर्भात आमदार घोरपडे यांनी, शासन स्तरावर पाठपुरावा करत महसूल विभागाचे लक्ष वेधले. त्यांनी दिलेल्या निवेदनात, १५ मार्च २०२१ च्या शासन परिपत्रकाचा उल्लेख करत, नगर भूमापनातील त्रुटी दुरुस्त करून मूळ रहिवाशांना न्याय देणे आवश्यक असल्याचे अधोरेखित केले.
यावर सकारात्मक भूमिका घेत महसूलमंत्री बावनकुळे यांनी सातारा जिल्हाधिकाऱ्यांना प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रशासनाच्या या हालचालीमुळे कोपर्डे हवेलीतील शेकडो मिळकतधारकांच्या नावासमोरील ‘ब सत्ता’ नोंद हटवून त्यांना पूर्ण मालकी हक्क मिळण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत लवकरात लवकर प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
कोपर्डे हवेलीतील ग्रामस्थांना तांत्रिक चुकीमुळे अनेक वर्षे त्रास सहन करावा लागला. या अन्यायाला पूर्णविराम देण्यासाठी शासनाने सकारात्मक पावले उचलली आहेत. लवकरच हा प्रश्न कायमचा मार्गी लागेल.
– आमदार मनोज घोरपडे



