नगरप्रदक्षिणेने श्री कृष्णामाईच्या चैत्री यात्रेची उत्साहात सांगता

कराड/प्रतिनिधी : –
कराडची ग्रामदैवता श्री कृष्णामाई देवीची चैत्री यात्रा यंदा भक्तिभाव, पारंपरिक विधी आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली. यात्रेच्या मुख्य दिवशी सोमवारी (दि. ६) धार्मिक विधी व विविध कार्यक्रमांनी रंगत आणली, तर मंगळवारी (दि. ७) पार पडलेल्या भव्य नगरप्रदक्षिणेने या यात्रा महोत्सवाची परंपरेनुसार सांगता करण्यात आली.
मंगळवारी सकाळपासूनच शहरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि गुलालाच्या उधळणीत देवीची पालखी शहरातून मार्गक्रमण करत होती. या भव्य मिरवणुकीत पालखीचे मानकरी, नागरिक आणि भाविक सहभागी झाले होते. शहरातील व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी ठिकठिकाणी पालखीचे स्वागत करत देवीच्या उत्सवमूर्तीचे दर्शन घेतले. पालखी मार्गावर महिलांनी काढलेल्या रंगीबेरंगी रांगोळ्यांनी वातावरण अधिकच मंगलमय झाले.
देवीच्या मुख्य मंडपापासून हटकेश्वर मंदिर, सोमवार पेठ, शुक्रवार पेठ, सात शहीद चौक, भोई गल्ली, आझाद चौक अशा प्रमुख मार्गांवरून पालखीची नगरप्रदक्षिणा पार पडली. सात शहीद चौक येथे विशेष आरती करण्यात आली. त्यानंतर मुख्य पेठमार्गे पालखी मंदिरात विसावल्यानंतर सायंकाळी लळीत कीर्तन व वसंतपूजा आणि रात्री येसूबाईच्या यात्रेने कृष्णामाई यात्रा महोत्सवाची सांगता झाली.



