मोकाशी शैक्षणिक संकुलात ‘अविष्कार 2K26’ उत्साहात

कराड/प्रतिनिधी : –
मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान, राजमाची (ता. कराड) संचलित संस्थांतर्गत विविध महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अविष्कार 2K26’ या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळ्याला दादासाहेब मोकाशी शैक्षणिक संकुलात उत्साहपूर्ण वातावरणात मोठा प्रतिसाद मिळाला. विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा सोहळा जल्लोषात पार पडला.
या कार्यक्रमासाठी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ, महाराष्ट्र कृषी पर्यटन संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग तावरे, रोमॅक्स पुणेचे कार्यकारी संचालक अविनाश जोगदंड, कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, शासकीय कृषी महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता डॉ. इंदिरा घनमोडे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तसेच किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाबासाहेब कदम, कराड मार्केट कमिटीचे सभापती सुनील पाटील आणि प्रतिष्ठानचे पदाधिकारी व प्राचार्यांचीही उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणून लोकप्रिय टीव्ही कलाकार संतोष पवार यांनी उपस्थिती लावून रंगत वाढवली. ख्यातनाम सूत्रसंचालिका तेजस्विनी शहा यांनी प्रभावी प्रश्नमंजुषा व निवेदनातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. याप्रसंगी प्रतिष्ठानच्या विविध महाविद्यालयांतील गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. एमपीएससी व बँकिंग क्षेत्रात यश मिळवून शासकीय सेवेत दाखल झालेल्या, तसेच उद्योजक व आधुनिक शेतीत प्रगती करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभवातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तेजस गाडेकर, गणेश होळकर, सुजित बर्गे, विशाल टकले आणि अक्षय गेजगे या यशस्वी माजी विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना रामकृष्ण वेताळ यांनी, विद्यार्थ्यांनी शेतीपूरक आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून स्वावलंबी बनावे व इतरांना रोजगार देणारे उद्योजक व्हावे, असे आवाहन केले. पांडुरंग तावरे यांनी, कृषी पर्यटनाचे महत्त्व अधोरेखित करत हे क्षेत्र शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पर्याय असल्याचे सांगितले. कृषी पदवीधरांनी या संधीचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी, तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून पालक व गुरूंच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करावी, असा सल्ला दिला. तसेच प्रतिष्ठानचे सचिव अभिजित मोकाशी यांच्या कृषी पर्यटन क्षेत्रातील योगदानाचा गौरवही त्यांनी केला.
कार्यक्रमात अविनाश जोगदंड, डॉ. इंदिरा घनमोडे, सुनील पाटील व विलास चौधरी यांनीही मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य, नाट्य व विविध कलाविष्कारांनी कार्यक्रमाला रंगत आणली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. शिंदे व प्रा. सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमास प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



