सातारा जिल्हाहोम

कृष्णामाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ

सोमवारी यात्रेचा मुख्य दिवस

कराड/प्रतिनिधी : –

कराडनगरीचे ग्रामदैवत श्री कृष्णामाईच्या चैत्री यात्रा महोत्सवास गुरुवारपासून पालखी मिरवणुकीने दिमाखात शुभारंभ झाला. पाच दिवस चालणाऱ्या यात्रेचा सोमवार (दि. ६) हा मुख्य दिवस असून, प्रथेप्रमाणे नित्याने पूजाअर्चा, विधी व धार्मिक तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रम संपन्न होणार आहेत.

हनुमान जयंतीच्या शुभमुहूर्तावर सायंकाळी उशिरा श्रीकृष्ण दत्तात्रय आवटे (पुजारी) यांच्या निवासस्थानातून ‘श्रीं’ची सवाद्य पालखी मिरवणूक निघाली आणि कृष्णामाई यात्रा महोत्सवास प्रारंभ झाला. सुवासिनींनी पूजन केल्यानंतर पालखी मार्गस्थ झाली. कृष्णा-कोयना नद्यांच्या अपूर्व प्रीतिसंगमावर कृष्णा घाटावरील मंडपात पालखी येऊन विसावली.

दरम्यान, कराडकर नागरिक व कृष्णामाईच्या भक्तांनी दर्शन घेण्यासह आपली उपस्थिती दर्शवली. सालाबादप्रमाणे मंडपात ‘श्रीं’ची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

Related Articles