दादासाहेब मोकाशी आयटीआयमध्ये प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
कराड/प्रतिनिधी : –
दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर करिअरच्या विविध वाटा खुल्या झाल्या आहेत. पारंपरिक शिक्षणासोबतच कौशल्याधारित शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल पाहता औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) हा आजच्या काळातील रोजगाराभिमुख पर्याय ठरत आहे. कराड तालुक्यातील राजमाची येथील दादासाहेब मोकाशी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया सुरू झाली असून, विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आजच्या स्पर्धात्मक युगात कमी कालावधीत रोजगार मिळवून देणारे अभ्यासक्रम म्हणून आयटीआय अभ्यासक्रमांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. फक्त एक ते दोन वर्षांच्या कालावधीत तांत्रिक कौशल्य प्राप्त होत असल्याने उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा ओढा दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे.राज्यातील शासकीय, तसेच खासगी आयटीआय संस्थांमध्ये सुमारे ८० ते ९० विविध व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जाते.
इलेक्ट्रिकल, फिटर, वेल्डर, मेकॅनिक, कॉम्प्युटर ऑपरेटर, ड्राफ्ट्समन यांसारख्या व्यवसायांना उद्योग क्षेत्रात मोठी मागणी आहे. आयटीआय उत्तीर्ण झाल्यानंतर गोदरेज, महिंद्रा, टाटा मोटर्स, क्रॉम्प्टन, व्होल्टास, रेल्वे, एअर इंडिया, ताज हॉटेल यांसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये अप्रेंटिसशिपची संधी मिळते. या कालावधीत विद्यार्थ्यांना पाच हजार ते पंचवीस हजार रुपयांपर्यंत स्टायपेंडदेखील मिळत असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली.
प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आणि केंद्रीकृत पद्धतीने राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर शासनाने निश्चित केलेली फी भरून जवळच्या शासकीय आयटीआयमध्ये अर्ज ‘कन्फर्म’ करणे आवश्यक आहे. अन्यथा विद्यार्थ्याचे नाव गुणवत्ता यादीत समाविष्ट होणार नाही. अर्ज भरताना गुणपत्रिकेप्रमाणे अचूक गुण नोंदविणे, योग्य प्रवर्ग निवडणे तसेच ट्रेड पसंतीक्रम काळजीपूर्वक भरणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या नावावरील जात प्रमाणपत्र, नॉन-क्रीमी लेयर, आधार कार्ड, अधिवास दाखला, बँक खाते आदी कागदपत्रे तयार ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्य, जिल्हा किंवा राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा प्रमाणपत्र तसेच इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुणांचा लाभ मिळणार आहे. प्रवेश प्रक्रियेतील सर्व संदेश नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठविले जात असल्याने प्रवेश निश्चित होईपर्यंत मोबाईल क्रमांक बदलू नये, असेही सांगण्यात आले.प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी admission.dvet.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा दादासाहेब मोकाशी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राजमाची येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्या प्रा. कदम मॅडम यांनी केले आहे.



