कराडमध्ये जनगणना प्रशिक्षणास सुरुवात
947 अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण; पहिल्या टप्प्यात 400 जणांना तीन दिवसीय मार्गदर्शन, घरगणनेवर विशेष भर

कराड/प्रतिनिधी : –
भारताच्या जनगणना 2026 प्रक्रियेला कराड ग्रामीण भागात वेग आला असून, या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सोमवारी उत्साहात सुरू झाले. यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयात आयोजित या प्रशिक्षण शिबिरात मोठ्या संख्येने प्रगणक आणि पर्यवेक्षक सहभागी झाले.
कार्यक्रमास कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले, कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, नायब तहसीलदार बाबुराव राठोड, पंचायत समितीच्या प्रभारी गटशिक्षण अधिकारी जमिला मुलाणी तसेच प्राचार्य डॉ. एस. बी. केंगार यांची प्रमुख उपस्थिती होती.
जनगणना प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात घरगणनेवर विशेष भर देण्यात येणार असून, यासाठी एकूण 816 प्रगणक आणि 131 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्वांना अचूक व सुसंगत माहिती संकलनासाठी टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण दिले जात आहे.
प्रशिक्षणाची संपूर्ण प्रक्रिया तीन टप्प्यांत राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 27 ते 29 एप्रिल दरम्यान सुमारे 400 प्रगणक व पर्यवेक्षकांना मार्गदर्शन केले जात आहे. दुसरा टप्पा 2 ते 4 मे या कालावधीत पार पडणार असून, त्यामध्ये आणखी 400 जणांचा समावेश असेल. अंतिम टप्पा 5 ते 7 मे दरम्यान होणार असून उर्वरित 147 जणांना प्रशिक्षण दिले जाईल.
या प्रशिक्षणात जनगणनेची पद्धत, माहिती संकलनाची अचूकता, तसेच ऑनलाइन प्रणालीद्वारे फॉर्म भरण्याचे तंत्र याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जात आहे. प्रशासनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या उपक्रमामुळे आगामी जनगणना अधिक सुटसुटीत, पारदर्शक आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.



