सातारा जिल्हाहोम

कराड अर्बनला ‘सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार’ जाहीर 

२५०१ ते ५००० कोटी ठेवींच्या गटात राज्यात तृतीय क्रमांक

कराड/प्रतिनिधी : – 

सहकारी बँकिंग क्षेत्रातील भक्कम आणि विश्वासार्ह वाटचालीची दखल घेत दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेडच्या वतीने देण्यात येणारा सन २०२५-२६ चा प्रतिष्ठेचा ‘सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार’ दि कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, कराडला जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे, सलग दुसऱ्या वर्षी हा बहुमान मिळवून कराड अर्बनने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीवर पुन्हा शिक्कामोर्तब केले आहे.

२५०१ कोटींपेक्षा अधिक ते ५००० कोटींपर्यंत ठेवी असलेल्या बँकांच्या गटात कराड अर्बनने राज्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे. बँकेची प्रगती, सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, तसेच सभासद, ग्राहक आणि हितचिंतकांनी दाखविलेला विश्वास या बाबींची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

गेल्या आर्थिक वर्षाच्या अखेरच्या सहा महिन्यांत बँकेने व्यवसायात तब्बल ७५० कोटी रुपयांहून अधिकची ऐतिहासिक वाढ नोंदविली. व्यवसायवाढीबरोबरच सातत्यपूर्ण आर्थिक प्रगती साधत बँकेने सहकारी बँकिंग क्षेत्रात आपले स्थान अधिक भक्कम केले आहे. नियोजनबद्ध विस्तार आणि प्रभावी व्यवस्थापनाच्या जोरावर बँकेने ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे.

बँकेचे अध्यक्ष समीर जोशी, उपाध्यक्ष शशांक पालकर, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सीए धनंजय शिंगटे यांच्या नेतृत्वाखाली बँकेची वाटचाल सुरू आहे. कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी तसेच बँकेचे माजी अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांचे मार्गदर्शनही बँकेच्या प्रगतीला लाभत आहे.

या यशाचे श्रेय केवळ व्यवस्थापनाला न देता सभासद, ग्राहक, हितचिंतक, संचालक मंडळ आणि सेवक वर्गाच्या सामूहिक योगदानाला दिले जात आहे. त्यांच्या विश्वास आणि कृतिपूर्ण सहभागामुळेच बँकेला सलग दुसऱ्यांदा ‘सर्वोत्कृष्ट बँक’ पुरस्काराचा बहुमान मिळाल्याचे बँकेच्या वतीने सांगण्यात आले.

दरम्यान, या पुरस्काराचा वितरण सोहळा शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता छत्रपती संभाजीनगर येथील सुंदरवाडीतील ‘एक्सप्रेस इन हेरिटेज’, जालना रोड, केंब्रिज स्कूलसमोर येथे होणार आहे. ही माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए धनंजय शिंगटे यांनी दिली.

कराड अर्बनच्या या उल्लेखनीय यशाबद्दल बँकेचे सभासद, ग्राहक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles