सातारा जिल्हाहोम

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळांशी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांचा संवाद 

कराड/प्रतिनिधी : – 

कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्याबरोबरच वाहतूक कोंडी, महिला सुरक्षा, सार्वजनिक उत्सवातील शिस्त आणि शहरातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी केवळ पोलीस यंत्रणेचे प्रयत्न पुरेसे नाहीत. पोलीस, नगरपालिका, सार्वजनिक मंडळे आणि नागरिकांनी समन्वयाने काम केल्यास कराड शहर अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सुंदर होऊ शकते, असा विश्वास पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी व्यक्त केला.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंगळे यांनी मंगळवारी कराडला भेट दिली. यावेळी त्यांनी शहरातील काही सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून उत्सवाचे नियोजन, वाहतूक व्यवस्था, महिला सुरक्षा, कायदा-सुव्यवस्था आणि नागरिकांचा सहभाग या विषयांवर चर्चा केली.

कराड शहरासाठी निश्चित करण्यात आलेल्या आठ अजेंड्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. शहरातील प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी ओळखून प्रशासनाला सहकार्य केल्यास अनेक स्थानिक प्रश्न सहजपणे मार्गी लागू शकतात. त्यामुळे पोलिसांच्या प्रयत्नांना नागरिक आणि विविध संस्थांची साथ आवश्यक असल्याचे पिंगळे यांनी स्पष्ट केले.

वाद्यांच्या परवानगीच्या मुद्द्यावर बोलताना, परवानगी देण्याचा विषय पोलिसांच्या अखत्यारीतील नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, उत्सव शांततेत आणि सामाजिक सलोखा कायम ठेवून पार पाडण्याची जबाबदारी सर्वांचीच असल्याचे त्यांनी नमूद केले.

शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणारी आणि अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी उभी असलेली वाहने हटविण्याची गरजही पिंगळे यांनी व्यक्त केली. यासाठी कराड नगरपालिकेच्या समन्वयाने कार्यवाही करण्याचे संकेत त्यांनी दिले. नव्या उड्डाणपुलामुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत झाली असून, त्याचा फायदा नागरिकांसोबतच पोलीस यंत्रणेलाही होत असल्याचे त्यांनी सांगितले.

गणेशोत्सव काळात किरकोळ कारणांवरून वाद निर्माण होऊन त्याचे रूपांतर गंभीर घटनांमध्ये होऊ नये, यासाठी सर्वांनी संयम बाळगावा. शांतता व सुव्यवस्था राखताना कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन पिंगळे यांनी केले.

कराड, मलकापूर, तसेच तालुक्यातील नागरिक सुज्ञ असून, प्रशासनाला त्यांचे नेहमीच सहकार्य मिळते. यापुढेही हे सहकार्य कायम राहील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पोलीस दल, नगरपालिका, सार्वजनिक गणेश मंडळे आणि नागरिक यांच्या समन्वयातून आठही अजेंड्यांची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास कराड शहर अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध करण्याच्या प्रयत्नांना निश्चितच बळ मिळेल, असे पिंगळे यांनी सांगितले.

गणेशोत्सव हा सामाजिक एकोपा वाढविणारा उत्सव आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांनी केवळ दिखाऊपणावर भर न देता समाजोपयोगी आणि विधायक उपक्रम राबवावेत. तरुणांनी उत्सवाच्या माध्यमातून समाजासाठी काहीतरी सकारात्मक करण्याची प्रेरणा घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

Related Articles