कराड मर्चंटचा व्यवसाय १,०५० कोटींवर
सभासदांना १२ टक्के लाभांश; ठेवी ६२२ कोटींवर, कर्जवाटप ४४० कोटी

कराड/प्रतिनिधी : –
कराड मर्चंट सहकारी क्रेडिट संस्थेने आर्थिक शिस्त, प्रभावी वसुली आणि सभासदांच्या विश्वासाच्या बळावर उल्लेखनीय आर्थिक प्रगती साधली असून, संस्थेचा एकत्रित व्यवसाय १,०५० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात ठेवी व कर्ज व्यवसायात गतवर्षाच्या तुलनेत १७ टक्के वाढ झाली असून, सभासदांना यंदा १२ टक्के लाभांश देण्याची घोषणा संस्थेचे कुटुंबप्रमुख सत्यनारायण मिणीयार यांनी केली.
कराड मर्चंट सहकारी क्रेडिट संस्थेची ४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा सत्यनारायण मिणीयार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. संस्थेचे ज्येष्ठ सभासद चंद्रकांत पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संचालक डॉ. शरद क्षीरसागर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. सभेत विविध विषयांचे वाचन करण्यात आले. सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली.
सभेत संस्थेच्या आर्थिक कामगिरीचा आढावा घेताना मिणीयार म्हणाले, ‘सभासदांच्या विश्वासामुळे संस्थेने सातत्याने गुणात्मक वाढ साधली आहे. मागील आर्थिक वर्षात संस्थेने ४२५ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले. प्रभावी वसुली, सातत्यपूर्ण ग्राहक संपर्क आणि काटेकोर आर्थिक नियोजनामुळे निव्वळ एनपीए शून्य टक्के राखण्यात यश आले आहे.
मार्च २०२६ अखेर संस्थेच्या ठेवी ५८५ कोटी रुपये होत्या. त्यात पुढील काळात वाढ होऊन सध्या ठेवी ६२२ कोटी रुपयांवर पोहोचल्या आहेत, तर कर्जवाटप ४४० कोटी रुपयांचे आहे. मागील आर्थिक वर्षात संस्थेला १८ कोटी २३ लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला. संस्थेच्या २७ शाखांमधून कामकाज सुरू असून, त्यापैकी १८ शाखा स्वमालकीच्या जागेत कार्यरत आहेत.
प्रमुख पाहुणे चंद्रकांत पवार यांच्या हस्ते ज्येष्ठ सभासद दिलीप लंगडे यांच्या ‘सुविचार संग्रह भाग-३’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी पवार यांनी, कराड मर्चंट संस्थेच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीचा आढावा घेतला. सत्यनारायण मिणीयार यांचे कराडमधील छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळा उभारणीतील योगदान अधोरेखित करत, शाहू महाराजांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या विचाराने संस्थेचे कामकाज सुरू असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. तसेच मिणीयार यांना दीर्घायुष्य लाभावे, अशी सदिच्छाही व्यक्त केली. पुस्तक प्रकाशनाबद्दल लंगडे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
संस्थेच्या चेअरमन अरुणा चव्हाण यांनी, संस्थेच्या प्रगतीचे श्रेय सभासदांच्या अढळ विश्वासाला आणि सहकार्याला दिले. सामाजिक बांधिलकी जपत ‘स्वर्गस्थ’ संकल्पनेच्या माध्यमातून जन्मानंतरचा प्रवास सुखकर झाला, त्याचप्रमाणे मृत्यूनंतरचाही प्रवास सुखकर व्हावा, या उद्देशाने उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय मर्चंट वधू-वर सूचक केंद्र सुरू करण्यात आले असून, सेवकांच्या हिताचा विचार करून मर्चंट सेवक पतसंस्थेचीही स्थापना करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. संस्थेने इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, आरटीजीएस, एनईएफटी, लॉकर सुविधा तसेच सर्व शाखांमध्ये सीबीएस प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. ग्राहकांच्या सुविधेसाठी क्यूआर कोडची आधुनिक सुविधाही सुरू करण्यात आली असून, त्याचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन चव्हाण यांनी केले.
सभेस महिला मर्चंट संस्थापिका भारती मिणीयार, व्हा. चेअरमन शिवाजीराव जगताप, संचालक आनंदराव शिंदे, सुरेश पवार, डॉ. मुकुंद लाहोटी, नथमल ओसवाल, वसंतराव हुलवान, किशोर झाड, अरविंद शिंदे, राहुल मिणीयार, भास्करराव पाटील, माणिकराव पाटील, आकाश जाधव, सागर भोंगाळे, राखी चव्हाण, मॅनेजर अशोक माटेकर आदी उपस्थित होते. अरविंद कलबुर्गी यांनी आभार मानले.



