सातारा जिल्हाहोम

सातारा जिल्हा बँक निवडणुकीत समन्वयाने काम करण्याचा प्रयत्न – आमदार डॉ. अतुल भोसले 

कराड/प्रतिनिधी : – 

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीत पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार भूमिका निश्चित केली जाईल. मात्र, राज्यात महायुतीचे सरकार एकोप्याने काम करत आहे. त्याच धर्तीवर सातारा जिल्ह्यातही महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये समन्वय ठेवून काम करण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे स्पष्ट मत भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले यांनी व्यक्त केले.

जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. भोसले बोलत होते.

मंत्री जयकुमार गोरे यांनी, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेची निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत. यासंदर्भात बोलताना डॉ. भोसले यांनी, महायुती म्हणून सलोख्याने निवडणुकीला सामोरे जाण्याचा प्रयत्न राहील. कोणालाही बाजूला ठेवून निवडणूक लढविण्याचा प्रश्न नाही. दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून सर्वांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगितले.

जिल्ह्यात भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात समन्वय राहावा, यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून आपण सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. राजकारणात प्रसंगी मतभेद किंवा राजकीय समीकरणांमध्ये चढ-उतार होत असले तरी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा पक्षपातळीवर प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच कराडमधून अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांना पाठिंबा देण्याची भूमिका आमदार डॉ. अतुल भोसले यांनी पुन्हा स्पष्ट केली. भाजपप्रणीत पॅनेल झाल्यास उंडाळकर यांची भूमिका काय असेल, यावर बोलताना डॉ. भोसले म्हणाले, आमच्यासोबत उंडाळकरही असतील. सहकारी संस्थांच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर होत नाहीत. त्यामुळे आमच्या आघाडीत ते नक्कीच सहभागी असतील. त्यांच्या या वक्तव्यामुळे उंडाळकर भाजपप्रणीत आघाडीसोबत राहणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

दरम्यान, आमदार डॉ. भोसले यांनी कराड येथील शासकीय विश्रामगृहाच्या मुख्य रस्त्याची पाहणी केली. रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, पावसाळा संपल्यानंतर या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. रस्त्यासाठी शासनाकडून ६९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

पावसाळा संपेपर्यंत नागरिकांना खड्ड्यांचा त्रास होऊ नये, तसेच जुन्या कोयना पुलावरून शहरात ये-जा करणाऱ्या वाहनधारकांची गैरसोय होऊ नये, यासाठी रस्त्यावरील खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजविण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले.

शासकीय विश्रामगृहाच्या संरक्षक भिंतीला भेग पडल्याचेही पाहणीदरम्यान निदर्शनास आले. ही बाब गांभीर्याने घेत सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने तात्पुरती डागडुजी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दोन दिवसांत ही डागडुजी पूर्ण करण्याचे निर्देश दिल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले.

कराडला राज्यासह देशाच्या नकाशावर विशेष महत्त्व असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विविध खात्यांचे मंत्री तसेच अनेक व्हीआयपींचे कराडमध्ये येणे-जाणे असते. त्यामुळे शासकीय विश्रामगृह परिसरातील पायाभूत सुविधा सुस्थितीत असणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.

भविष्यात शासकीय विश्रामगृहाच्या विस्तारीकरणासाठी नवीन इमारत उभारताना जुन्या संरक्षक भिंतीचा समावेश अंदाजपत्रकात करून त्या ठिकाणी नवीन भिंत उभारण्याचे नियोजन करण्यात येईल, असेही डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच कराड नगरपालिका प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.

Related Articles