जागतिक पत्रलेखन दिनानिमित्त सरस्वती विद्यामंदिरात पत्रसंस्कृतीचा जागर

कराड/प्रतिनिधी : –
मोबाईल, सोशल मीडिया आणि डिजिटल संदेशांच्या युगात लोप पावत चाललेल्या पत्रलेखनाच्या संस्कृतीची विद्यार्थ्यांना नव्याने ओळख व्हावी, तसेच लेखनातून भावना व्यक्त करण्याची कला विकसित व्हावी, या उद्देशाने जागतिक पत्रलेखन दिनानिमित्त जनकल्याण प्रतिष्ठान संचालित सरस्वती विद्यामंदिर, कराड येथे विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
१ सप्टेंबर रोजी झालेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांना पत्रलेखनाची परंपरा, पत्रांचे विविध प्रकार, पत्राची रचना, लेखनशैली आणि त्याची वैशिष्ट्ये याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पोस्टाच्या तिकिटांचा इतिहास, त्यांचे महत्त्व आणि विविध प्रकार यांचीही माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
पोस्ट विभागाचे अधिकारी श्री. देशमुख आणि श्री. सोनावले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना दिलेल्या माहितीवर आधारित प्रश्नमंजुषा घेतली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत प्रश्नांची अचूक उत्तरे दिली. उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले.
यावेळी आगामी ‘भारत मातेस पत्र’ आणि ‘भारत मातेच्या प्रतिमेचे चित्रण’ या स्पर्धांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या कल्पकतेला, लेखनकौशल्याला आणि कलागुणांना वाव द्यावा, असे आवाहन करण्यात आले.
पत्रलेखनाच्या माध्यमातून भावना, विचार आणि अनुभव प्रभावीपणे व्यक्त करण्याबरोबरच सुसंवादाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजले. तसेच पोस्टाच्या सेवांविषयी माहिती मिळाल्याने जुन्या पत्रसंस्कृतीबद्दल विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल निर्माण झाले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये लेखनाची आवड निर्माण करण्यासह संवादकौशल्य विकसित करण्यासही हातभार लागला.
या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शिक्षकांनी सहकार्य केले. उपस्थितांचे आभार सुवर्ण काटकर यांनी मानले.



