कराडमध्ये तिरंगा रॅलीत हजारो नागरिकांचा सहभाग

कराड/प्रतिनिधी : –
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत कराड शहरात गुरुवारी (दि. १३) देशभक्तीचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला. शालेय विद्यार्थ्यांसह हजारो नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागातून शहरातून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. तब्बल ३५० फुटांचा भव्य तिरंगा हे रॅलीचे प्रमुख आकर्षण ठरले.

कन्या शाळेपासून सुरू झालेल्या या रॅलीने चावडी चौक, आझाद चौक मार्गे दत्त चौक गाठला. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी शहरातील वातावरण भारावून गेले. विद्यार्थ्यांनी हातात तिरंगे घेऊन, तसेच देशभक्तीपर घोषणा देत रॅलीत सहभाग नोंदविला. रॅलीस आमदार डॉ. अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे यांच्यासह कराड-मलकापूर परिसरातील लोकप्रतिनिधी, प्रांताधिकारी अतुल मेहत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. प्रशासनातील अधिकारी, ज्येष्ठ नागरिक, खेळाडू, माजी सैनिक, राजकीय व सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह विविध क्षेत्रांतील नागरिकांनीही रॅलीत सहभाग घेतला.
यावेळी आमदार डॉ. अतुल भोसले म्हणाले, ‘हर घर तिरंगा, हर मन तिरंगा’ या अभियानाला कराडमध्ये युवक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. विविध जाती-धर्मांतील नागरिकांनी एकत्र येऊन ‘देश प्रथम, राष्ट्र प्रथम’ ही भावना दृढ करण्याचा संदेश या तिरंगा यात्रेतून दिला आहे. कराड ही स्वातंत्र्यसैनिकांची भूमी असून, देशाला आणि राज्याला दिशा देणारा आदर्श निर्माण करण्याची परंपरा या भूमीला लाभली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने युवकांसह सर्व नागरिक एकत्र येऊन हा राष्ट्रीय उत्सव साजरा करीत असल्याचे सांगत त्यांनी सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. तिरंगा रॅलीच्या निमित्ताने शहरात ठिकठिकाणी देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी रॅलीत सहभागी होत राष्ट्रीय एकात्मता आणि देशप्रेमाचा संदेश दिला.



