माजी सैनिकांचा कराडमध्ये ‘ECHS बचाओ, OIC हटाव’चा नारा
औषधांचा तुटवडा, तपासणी यंत्रणा व रुग्णालयांचे करार संपल्याचा आरोप

कराड/प्रतिनिधी : –
माजी सैनिकांना आरोग्य सुविधा देणारे कराड येथील ECHS पॉलीक्लिनिक गेल्या १२ दिवसांपासून बंद असल्याच्या निषेधार्थ शेकडो माजी सैनिकांनी गुरुवारी कराडमध्ये निषेध मोर्चा काढला. पॉलीक्लिनिकचे OIC निवृत्त लेफ्टनंट कर्नल नितीन शिनगारे यांच्या कारभारावर माजी सैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, ‘OIC हटाव, ECHS बचाओ’ अशा घोषणा दिल्या.
शहरातील विजय दिवस चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. विजयस्तंभाला पुष्पहार अर्पण केल्यानंतर दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर हातात तिरंगा ध्वज घेऊन माजी सैनिकांनी बाइक रॅलीद्वारे ECHS पॉलीक्लिनिक गाठले. यावेळी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ यांसह विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला.
माजी सैनिकांच्या म्हणण्यानुसार, ECHS सुविधेसाठी निवृत्तीच्या वेळी सैनिकांच्या रँकनुसार आर्थिक रक्कम कपात केली जाते. असे असतानाही पॉलीक्लिनिकमधील आरोग्य सुविधा बंद राहणे गंभीर बाब आहे. सर्व्हर/VPS यंत्रणा बंद असल्याने कामकाज ठप्प झाले असून, वीजपुरवठा खंडित झाल्यास बॅटरी बॅकअप व जनरेटरचीही पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याचा आरोप करण्यात आला. CBC रक्त तपासणी मशीन अनेक दिवसांपासून बंद असून, त्याच्या देखभालीसाठी पेशंट वेल्फेअर फंडातून खर्च झाल्यानंतरही मशीन सुरू का करण्यात आले नाही, याची चौकशी करण्याची मागणी माजी सैनिकांनी केली. तसेच कृष्णा हॉस्पिटल व संजीवन हॉस्पिटलसोबतचे एक वर्षाचे करार संपल्याने रेफरल सेवा बंद झाल्याचे सांगण्यात आले. पॉलीक्लिनिकमध्ये औषधांचा तुटवडा असून, ‘ना मेडिसिन, ना हॉस्पिटल’ अशी परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोपही करण्यात आला. विशेषतः वयोवृद्ध माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे आंदोलकांनी सांगितले. रुग्णवाहिका सेवेबाबतही अनिश्चितता असल्याचा मुद्दा मोर्चादरम्यान उपस्थित करण्यात आला.
माजी सैनिकांनी पॉलीक्लिनिकच्या प्रशासकीय कारभाराबाबत OIC यांना जबाबदारी आणि SOP विषयी जाब विचारला. मात्र, यावेळी समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. देशाच्या सीमेवर सेवा बजावलेल्या सैनिकांना निवृत्तीनंतर त्यांच्या आरोग्याच्या मूलभूत सुविधांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागत असेल, तर ही प्रशासनासाठी गंभीर बाब असल्याची संतप्त भावना माजी सैनिकांनी व्यक्त केली.
कराड ECHS पॉलीक्लिनिकचे OIC निवृत्त ले. कर्नल नितीन शिनगारे यांना पदावरून हटवून त्यांच्या कारभाराची चौकशी करावी, दोषींवर कारवाई करावी आणि पॉलीक्लिनिकमधील सर्व आरोग्य सुविधा तातडीने पूर्ववत कराव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री, माजी सैनिक कल्याण मंत्री, संरक्षण मंत्री, ECHS जनरल दिल्ली, सब एरिया कमांडर व स्टेशन हेडक्वार्टर्स यांच्याकडे करण्यात आली. मोर्चात माजी सैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सैनिक फेडरेशन माजी सैनिक संघटनेचे प्रशांत कदम यांच्यासह पदाधिकारी व माजी सैनिक उपस्थित होते.



