सातारा जिल्हाहोम

कराड नगरपालिकेची सर्वसाधारण सभा ठरली वादळी 

विविध मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी

कराड/प्रतिनिधी : – 

कराड नगरपालिकेची मंगळवारी झालेली मासिक सर्वसाधारण सभा विविध विकासकामांच्या प्रस्तावांवरून चांगलीच वादळी ठरली. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतील प्रस्तावित नेकलेस रोड, मंगळवार पेठेतील एक कोटी वीस लाखांच्या उद्यानाचा प्रस्ताव, सोमवार पेठेतील रस्त्याची रुंदी, घनकचरा प्रकल्प, तसेच खासगी कंपन्यांच्या पाइपलाइनसह विविध विषयांवर सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. अखेर नेकलेस रोड आणि उद्यान विकासाचे दोन्ही महत्त्वाचे ठराव सभेत तहकूब करण्यात आले.

नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे, सर्व नगरसेवक, नगरसेविका, तसेच पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण स्मृतीसदनापासून शहरालगत प्रस्तावित नेकलेस रोडचा विषय चर्चेला आला. या प्रकल्पाला विरोध का केला जात आहे, असा सवाल भाजपच्या नगरसेवकांनी उपस्थित करत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर यांनीही याबाबत स्पष्ट भूमिका मांडण्याची मागणी केली.

यावर उत्तर देताना नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी, अद्याप संबंधित शासकीय विभागाकडून प्रकल्पाचे सादरीकरण किंवा अधिकृत माहिती नगरपालिकेला उपलब्ध करून देण्यात आलेली नसल्याचे सांगितले. पालिकेने वारंवार पाठपुरावा करूनही प्रकल्पाचे सादरीकरण झाले नसल्याने सुमारे साडेसहा कोटी रुपयांचा हा संवेदनशील विषय सध्या तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आमदारांनी मंजूर करून दिलेले प्रकल्प आणि निधी वापरायचेच नाही, असा काही निर्णय घेतला आहे का? असा प्रश्न विजय वाटेगावकर यांनी उपस्थित करताच सभागृहात पुन्हा एकदा वातावरण तापले. यावेळी सत्ताधारी गटातील विजयसिंह यादव, अख्तर आंबेकरी, जयंतकाका पाटील, प्रवीण पवार आणि सुहास पवार यांनी चर्चेत सहभाग घेत आपापली मते मांडली. अखेर नगराध्यक्षांनी हस्तक्षेप करत हा विषय अधिक माहिती उपलब्ध झाल्यानंतरच पुन्हा चर्चेला आणला जाईल, असे स्पष्ट केले. भाजपच्या नगरसेवकांनी मात्र प्रकल्पाला आपला पाठिंबा असल्याचे स्पष्ट करत तो तातडीने मंजूर करण्याची भूमिका मांडली.

सभेत मंगळवार पेठेतील मोकळ्या भूखंडावर एक कोटी वीस लाख रुपये खर्चून उद्यान विकसित करण्याचा प्रस्तावही चर्चेचा विषय ठरला. भाजपच्या सदस्यांनी शहराला सुशोभिकरणासाठी बागेची आवश्यकता असल्याचे सांगत प्रस्तावाला पाठिंबा दिला. मात्र सत्ताधारी गटाने त्या जागेवर भविष्यात शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याचा विचार असून, त्यामुळे नगरपालिकेला कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध होईल, अशी भूमिका मांडत हा प्रस्तावही तहकूब केला.

तसेच यशवंतराव चव्हाण स्मृती सदन (टाऊनहॉल) इमारतीच्या दुरुस्ती व आधुनिकीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. या कामासाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती नगराध्यक्ष यादव यांनी सभागृहात दिली. प्रशासकीय कालावधीत झालेल्या घनकचरा प्रकल्प, रस्ते आणि इतर विकासकामांची चौकशी केली जाणार असल्याचेही सभेत स्पष्ट करण्यात आले.

Related Articles