सकारात्मक दृष्टिकोनातूनच स्पर्धा परीक्षेत यश संपादन करता येते – पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे
महिला महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन

कराड/प्रतिनिधी : –
कठोर परिश्रम, योग्य दिशा व सकारात्मक दृष्टिकोनातूनच स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करता येते, असे प्रतिपादन सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी केले.
शिक्षण मंडळ, कराड संचालित महिला महाविद्यालयात लोकमान्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन करताना श्री. पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक दत्तात्रय दराडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत बल्लाळ, उपप्राचार्य डॉ. पराग सोनटक्के, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश चिवटे, सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक पिंगळे म्हणाले, स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी कारकीर्दचे नियोजन, अभ्यासाचे व वेळेचे प्रभावी व्यवस्थापन, शिस्त, सातत्य, आत्मविश्वास, नियमित सराव, अपयशाने खचून न जाण्याचा दृष्टिकोन, तज्ज्ञ साधन व्यक्तींचे मार्गदर्शन, मुलाखतींचा सराव आदी. घटक आवश्यक असतात. लोकमान्य स्पर्धा परीक्षा केद्रामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना दर्जेदार स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपलब्ध झाले आहे. विद्यार्थिनींनी याचा लाभ घेऊन स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तुंग यश संपादन करावे व कारकिर्दींच्या विविध संधींचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विलास सुर्वे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रेखा धुळप, तर आभार डॉ. प्रीतम मिसाळ यांनी मानले.



