कराडमध्ये काँग्रेसचा कॅन्डल मार्च
विद्यार्थी एकजुटीचा विजय; NEET-सीबीएसईच्या प्रश्नांवर सत्याग्रह; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे स्वागत

कराड/प्रतिनिधी : –
विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत कराडमध्ये काँग्रेसच्या वतीने कॅन्डल मार्च आणि सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात झालेल्या या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांच्या आदेशानुसार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थी गेल्या ३६ दिवसांपासून आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततामय मार्गाने आंदोलन करीत आहेत. या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष कारवाईचा निषेध करत काँग्रेसने विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांवर केंद्र सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले. हा राजीनामा विद्यार्थी एकजुटीचा, लोकशाही मूल्यांचा आणि विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा विजय असल्याची भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांवर कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाऊ शकत नाही. गेल्या ३६ दिवसांपासून विद्यार्थी संयमाने आणि लोकशाही मार्गाने न्यायाची मागणी करीत आहेत. त्यांच्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासूनच पाठिंबा दिला आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा आणि लोकशाहीवरील विश्वासाचा विजय आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्या पूर्ण होईपर्यंत काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असे त्यांनी सांगितले.
शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण करून विद्यार्थ्यांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने आवश्यक निर्णय घ्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी दूर करून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला अविश्वास दूर करावा आणि त्यांच्या न्याय्य मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अशी मागणी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली.



