जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील रविवारी कराड दौऱ्यावर
कराड तालुक्यातील विविध सिंचन प्रकल्पांची करणार प्रत्यक्ष पाहणी

कराड/प्रतिनिधी : –
महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील हे रविवार दि. २६ जुलै रोजी कराड तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते कराड तालुक्यातील महत्त्वाच्या सिंचन प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत.
रविवारी (ता. २६) दुपारी ३.१५ वाजता खोडशी (ता. कराड) येथे ना.डॉ. विखे-पाटील यांचे आगमन होणार असून, तेथे ते खोडशी बंधाऱ्याची प्रत्यक्ष पाहणी करतील. त्यानंतर कृष्णा कालव्याची पाहणी करून कालव्याच्या सद्यस्थितीचा तसेच सिंचन व्यवस्थेचा आढावा घेतील. यानंतर टेंभू उपसा सिंचन योजनेअंतर्गत टेंभू पंपगृह टप्पा १-अ, टेंभू बॅरेज आणि टेंभू पंपगृह टप्पा १-ब या महत्त्वाच्या प्रकल्पांना भेट देऊन, तेथील कामांची पाहणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पांमुळे कराडसह सांगली जिल्ह्यातील शेतीला मोठा लाभ होत असल्याने या पाहणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
पाहणीदरम्यान जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकारी व अभियंत्यांसोबत मंत्री डॉ. विखे-पाटील सविस्तर चर्चा करणार आहेत. यामध्ये प्रकल्पांची सद्यस्थिती, सुरू असलेली कामे, प्रलंबित बाबी, भविष्यातील नियोजन तसेच प्रस्तावित विकासकामांबाबत ते संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. सिंचन प्रकल्पांच्या पाहणीनंतर मंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील हे मलकापूर-कराड येथील कृष्णा विश्व विद्यापीठाला भेट देणार आहेत. तेथील नियोजित कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी सुमारे ६.१५ वाजता ते मोटारीने साताऱ्याकडे प्रयाण करणार आहेत.
जलसंपदा मंत्र्यांच्या या दौऱ्यामुळे कराड तालुक्यातील सिंचन प्रकल्पांच्या प्रगतीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, स्थानिक शेतकरी आणि नागरिकांचे या दौऱ्याकडे लक्ष लागले आहे.



