कराडमध्ये अजंठा मित्रपरिवाराकडून २०० रोपांचे वाटप
आषाढी एकादशीनिमित्त उपक्रम; पर्यावरण संवर्धनाचा जागर

कराड/प्रतिनिधी : –
आषाढी एकादशीच्या पावन पर्वाचे औचित्य साधत अजंठा मित्रपरिवाराच्या वतीने कराड शहरात पर्यावरण संवर्धनाचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. तसेच यावेळी आषाढी एकादशीच्या निमित्ताने फळ व उपवासाच्या फराळाचे पदार्थ आणि पाणी वाटप करण्यात आले.
शहरातील मुख्य पोस्ट कार्यालयाजवळील कै. प्रभाकर बळवंत पवार (पोळ) चौकात नागरिकांना विविध प्रजातींच्या तब्बल २०० रोपांचे मोफत वाटप करण्यात आले. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा पर्यावरणपूरक संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आषाढी एकादशीच्या निमित्ताने धार्मिक भावनेला पर्यावरण संवर्धनाची जोड देत वृक्षारोपणाची चळवळ अधिक व्यापक करण्याचा संदेश अजंठा मित्रपरिवाराने या माध्यमातून दिला.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ या अभंगातील पर्यावरणप्रेमाचा विचार पुढे नेत झाडे, वेली, वनचर आणि पक्षी हे निसर्गातील आपलेच आप्त आहेत, ही भावना नागरिकांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. केवळ रोपांचे वाटप न करता त्यांचे संगोपन करून पर्यावरण समृद्ध करण्याचे आवाहनही उपस्थितांना करण्यात आले.
या उपक्रमास कराड नगरपालिकेच्या नगरसेविका अनिता प्रभाकर पवार, अक्षय पवार, अजंठा मित्रपरिवाराचे सदस्य, शहरातील व्यापारी, रिक्षा असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य, तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



