आयुष्यमान स्पेशलमहाराष्ट्रसातारा जिल्हाहोम

“कराडच्या वाहतुकीला मोठा दिलासा; सहापदरी उड्डाणपूल अंतिम टप्प्यात, उदयनराजेंकडून पाहणी”

उड्डाणपुलाच्या कामाची पाहणीवेळी आ. डॉ. अतुल भोसले, आ. मनोज घोरपडे, मा.आ. आनंदराव पाटील यांची उपस्थिती

 

कराड/प्रतिनिधी : – 

पुणे-बंगलुरु राष्ट्रीय महामार्गावरील कराड शहरातील वाढत्या वाहतुकीच्या समस्येवर तोडगा म्हणून उभारण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी सहापदरी उड्डाणपुलाच्या कामाची खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी रविवारी प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी केली. या वेळी उड्डाणपुलाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आणि ठेकेदार कंपनीला आवश्यक सूचना दिल्या.

कराड शहर ते नांदलापूर या दरम्यान साकारत असलेला हा उड्डाणपूल पुणे–बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सर्वांत महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांपैकी एक मानला जात आहे. तब्बल ३.४७ किलोमीटर लांबीचा हा सहापदरी उड्डाणपूल शेंद्रे ते नेर्ले या २,२२० कोटी रुपयांच्या महामार्ग विकास प्रकल्पाचा अविभाज्य भाग असून, केवळ उड्डाणपुलासाठी सुमारे ४५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.

सध्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात असून, पावसाळ्यापूर्वी तो वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने युद्धपातळीवर काम सुरू आहे. पाहणीदरम्यान खासदार उदयनराजे भोसले यांनी कामाचा दर्जा, प्रगती आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांची सविस्तर माहिती घेतली. तसेच कामामध्ये कोणतीही दिरंगाई न करता सर्व तांत्रिक आणि सुरक्षा बाबी तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना खा. उदयनराजे भोसले म्हणाले, कराड शहर आणि परिसरातील वाहतुकीची वाढती समस्या लक्षात घेता हा उड्डाणपूल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. महामार्गावरील वाहतूक अधिक गतिमान, सुरक्षित आणि सुरळीत करण्यासाठी हा प्रकल्प निर्णायक भूमिका बजावेल. विशेषतः कराड शहरातील वाहतुकीचा ताण कमी होऊन स्थानिक नागरिक, व्यापारी तसेच हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ते म्हणाले, पुणे ते बंगलुरु हा देशातील सर्वाधिक वर्दळीचा राष्ट्रीय महामार्ग असून, या मार्गावरील वाहतूक अधिक वेगवान आणि अडथळामुक्त करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध पायाभूत सुविधा प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या उड्डाणपुलाच्या माध्यमातून वाहतुकीतील अडथळे कमी होऊन अपघातांचे प्रमाणही घटण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या प्रकल्पाच्या उभारणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सुनेत्राताई पवार यांचे सहकार्य लाभत असल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला.

या पाहणी दौऱ्यात कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले, कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, माजी आमदार आनंदराव पाटील, सुनील काटकर, काका धुमाळ, नयन निकम, चिन्मय कुलकर्णी, अॅड. विनित पाटील, अभिजित गावडे यांच्यासह डी. पी. जैन कंपनीचे प्रकल्प अधिकारी दीपक कन्होजे, सोमेश यादव, जितेश भोयर तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी अजित घारे उपस्थित होते.

Related Articles