सातारा जिल्हाहोम

सत्ताकाळात शहाणपण का सुचले नाही! – डॉ. सुरेश भोसले

सहकार पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ, एफआरपीपेक्षा अधिक दर देणार असल्याची ग्वाही 

कराड/प्रतिनिधी : – 

निवडणुकीच्या तोंडावर पाणीपट्टी आणि शेतकरी हिताच्या मुद्द्यांवर विरोधकांकडून मोठमोठ्या घोषणा केल्या जात आहेत. मात्र सत्तेत असताना पाणीपट्टी कमी करण्याचे शहाणपण त्यांना का सुचले नाही, असा सवाल उपस्थित करत कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

विरोधकांच्या काळात कारखान्याची आर्थिक स्थिती खालावली होती, मात्र अडचणीत असलेल्या कारखान्याला सक्षमपणे उभारी देत उत्पादनवाढ, विस्तारीकरण आणि शेतकरीहिताचे निर्णय राबविण्यात यश आले असल्याचा दावा त्यांनी केला. राज्यातील अनेक सहकारी साखर कारखाने अडचणीत असतानाही कृष्णा कारखाना यंदाही एफआरपीपेक्षा अधिक दर देईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वडगाव हवेली (ता. कराड) येथे आयोजित सहकारमहर्षी जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्या प्रचार शुभारंभ सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वडगाव हवेलीचे माजी सरपंच सत्यवान जगताप होते. यावेळी ज्येष्ठ नेते व कारखान्याचे माजी चेअरमन मदनराव मोहिते, आमदार डॉ. अतुल भोसले, व्हाइस चेअरमन जगदीश जगताप, दयानंद पाटील, मनोहर शिंदे, तेजस सोनवणे, प्रा. धनाजी काटकर यांच्यासह सहकार पॅनलचे सर्व उमेदवार उपस्थित होते.

डॉ. भोसले म्हणाले, २००६-०७ मध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र २०१० मध्ये विरोधक सत्तेत आल्यानंतर कारखान्याचा कारभार योग्य पद्धतीने सुरू नसल्याचे दिसून आले. त्यामुळे २०१५ मध्ये पुन्हा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. अडचणीत असलेला कारखाना ताब्यात घेतल्यानंतर अवघ्या सहा वर्षांत तो आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात यश आले. त्यानंतरच्या काळात विस्तारीकरणामुळे ऊस वेळेत गाळपासाठी नेणे शक्य झाले असून आता १५ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

विरोधकांवर निशाणा साधताना त्यांनी सांगितले की, विरोधकांना उत्पादनवाढ साधता आली नाही. आज कारखान्यातून एक लाख लिटर उत्पादन होत आहे. साखरेच्या मूळ उत्पन्नात वाढ करण्यातही ते अपयशी ठरले. ऑडिटरने पाच वर्षे कारभारावर पांघरूण घातल्याने कारखान्याची स्थिती बिकट झाली होती. आज मात्र ते विकासाच्या गप्पा मारत आहेत. सभासद सुज्ञ आहेत आणि योग्य निर्णय घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यातील सहकारी साखर कारखाने आर्थिक संकटाचा सामना करत असताना कृष्णा कारखाना शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा अधिक दर देण्यास सक्षम असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. सहकार क्षेत्र अडचणीत असताना राजकारण बाजूला ठेवून विश्वजीत कदम, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील आणि उदयसिंह पाटील यांनी सहकार्याची भूमिका घेतल्याचेही त्यांनी नमूद केले.

पाणीपुरवठा योजनांबाबत माहिती देताना डॉ. भोसले म्हणाले, कारखान्याच्या मालकीच्या पाच पाणीपुरवठा योजना यशस्वीपणे सुरू आहेत. या योजनांचे नूतनीकरण, ठिबक सिंचनाचा विस्तार आणि क्षारपड जमिनींच्या निचऱ्यासाठी नवीन उपक्रम राबविण्यात येणार आहेत. शासनाच्या विविध योजनांतून निधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार अतुल भोसले प्रयत्नशील आहेत. कराड दक्षिण मतदारसंघात पाणंद रस्त्यांसाठी ४५ कोटी रुपयांचा निधी आणण्यात आला असून त्याचा शेतकऱ्यांना मोठा लाभ होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

आमदार डॉ. अतुल भोसले यांनी विरोधकांच्या कारभारावर टीका करताना सांगितले की, बोगस कर्जवाटपामुळे कारखाना अडचणीत आला होता. मात्र डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याला नवी दिशा मिळाली. शेतकऱ्यांना उच्चांकी दर देण्यात आला, विस्तारीकरण करण्यात आले आणि गेल्या अकरा वर्षांत ७८ कोटी रुपयांची ६० किलो साखर घरपोच देण्यात आली.

विरोधकांच्या काळात उसाला टनामागे ३०० रुपये कमी दर देण्यात आला होता, असा आरोपही त्यांनी केला. तोडणी व वाहतूक व्यवस्थेतील अडचणींचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, २५७६ तोडणी-वाहतूक वाहनांशी करार करण्यात आला होता. मात्र त्यापैकी सुमारे ११०० वाहने उपलब्ध झाली नाहीत. तरीही कारखान्याने ऊस गाळप सुरळीत ठेवले. काहीही करून सत्तेत येऊन भूतकाळातील चुका झाकण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला.

केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न सुरू असून सहकारी पाणीपुरवठा योजना, कृष्णा कारखाना आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ यांच्या माध्यमातून विकासाची कामे पुढे नेली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

व्हाइस चेअरमन जनदीश जगताप यांनी स्व. जयवंतराव भोसले आणि डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील कारखान्याच्या प्रगतीचा आढावा घेतला. आज कार्यक्षेत्रातील शेतकरी एकरी १०० ते १२० टन ऊस उत्पादन घेत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हेच उत्पादन १५० ते २०० टनांपर्यंत नेण्याचे स्वप्न डॉ. सुरेश भोसले यांनी पाहिले असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रा. धनाजी काटकर यांनी कृष्णा उद्योग समूहाच्या उभारणीत स्व. जयवंतराव भोसले यांच्या योगदानाचा गौरव केला. पक्षीय राजकारण वेगळे असले तरी सहकार क्षेत्रात विधायक भूमिका घेण्याची परंपरा कायम राहिली असून उदयसिंह पाटील यांनीही कार्यकर्त्यांना सहकार पॅनलच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहण्याच्या सूचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोकराव जगताप यांनी केले. सभेला कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकरी सभासद, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Related Articles