सातारा जिल्हाहोम

कराडमध्ये शेतकऱ्यांसाठी ‘एआय शेती’ची विशेष परिषद घेणार 

आमदार डॉ. अतुल भोसले; पाणी व्यवस्थापनावर भर, ४० हजार शेतकऱ्यांकडून कृषी अ‍ॅपचा स्वीकार 

कराड/प्रतिनिधी : – 

कराड तालुक्यातील शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत असून, ‘एआय’च्या (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापरातून शेतीत उत्पादनवाढ साधत आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना एआयविषयी सखोल मार्गदर्शन मिळावे यासाठी लवकरच तालुक्यात विशेष परिषद आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले यांनी दिली.

येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन येथे पार पडलेल्या खरीप हंगाम पूर्व नियोजन बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बैठकीस कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांच्यासह विविध पदाधिकारी व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

डॉ. भोसले यांनी तालुक्यातील पाणी व्यवस्थापनाच्या समस्येकडे लक्ष वेधले. काही गावांमध्ये पाण्याची टंचाई तर काही ठिकाणी अति वापर होत असल्याने जमिनीची गुणवत्ता घसरत असल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यात पाण्याचे महत्त्व अधिक वाढणार असून, शेतकऱ्यांनी पाणी जपून वापरणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच कृषी विभागातील रिक्त पदांचा प्रश्न लवकर सोडवण्यासाठी कृषी मंत्र्यांशी चर्चा केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

आमदार मनोज घोरपडे म्हणाले, यांत्रिकीकरणाच्या बाबतीत कराड तालुका राज्यात आघाडीवर असून, एआय तंत्रज्ञानाच्या वापरातही तालुका पुढे आहे. सुमारे ४० हजार शेतकऱ्यांनी कृषी अ‍ॅप डाउनलोड केल्याने एआयचा सर्वाधिक वापर करणारा तालुका म्हणून कराडचा उल्लेख होत असल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीत रब्बी हंगामातील पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय मृद आरोग्य पत्रिका वाटप, तसेच पंतप्रधान अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या उत्कृष्ट उद्योगांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

Related Articles