सातारा जिल्हाहोम

दिशाभूल करणाऱ्या जनगणना प्रक्रियेत दुरुस्ती करा – भानुदास माळी

कराड/प्रतिनिधी : – 

देशभर सुरू असलेल्या जनगणना प्रक्रियेत इतर मागासवर्गीय (ओबीसी), तसेच अनुसूचित जाती-जमातींसाठी स्वतंत्र नोंद किंवा स्पष्ट वर्गीकरण दिसत नसल्याचा आरोप करत काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रक्रियेत तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा ही जनगणना दिशाभूल करणारी ठरेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस भानुदास माळी यांनी दिला.

कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक अशोकराव पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल पवार व तालुकाध्यक्ष देवदास माने, अनुसूचित जाती-जमाती आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय तडाखे, शहराध्यक्ष अॅड. अमित जाधव, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष दिग्विजय सूर्यवंशी, तसेच अॅड. संभाजीराव मोहिते उपस्थित होते.

माळी म्हणाले, सामाजिक न्यायाच्या दृष्टीने अचूक माहिती महत्त्वाची असताना जनगणनेतच संबंधित घटकांची नोंद अस्पष्ट ठेवणे हे गंभीर आहे. शासनाने त्वरित स्पष्ट धोरण जाहीर करून सर्व घटकांचा समावेश करावा, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून राज्यभर विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. यासाठी स्वतंत्र जयंती उत्सव समिती स्थापन करण्यात आली असून, तिचे अध्यक्षपद माळी यांच्याकडे देण्यात आले आहे. वर्षभर फुले यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी व्याख्याने, शिबिरे आणि जनजागृती कार्यक्रम घेतले जाणार आहेत. या उपक्रमांचे नियोजन आणि अंमलबजावणीची जबाबदारी अॅड. संभाजीराव मोहिते यांच्यावर सोपविण्यात येणार आहे.

या उपक्रमांचा समारोप ११ एप्रिल २०२७ रोजी नायगाव किंवा कटगूण येथे मोठ्या कार्यक्रमाने करण्याचा मानस असून, त्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि अशोक गहलोत यांना निमंत्रित केले जाणार असल्याचेही माळी यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी स्मार्ट मीटर प्रकल्पावरही जोरदार टीका केली. जनतेचा विरोध असतानाही हा प्रकल्प रेटला जात असून, हजारो कोटींचे कंत्राट उद्योगसमूहाला देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. कुसुम सोलर योजनेबाबतही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत ती अपेक्षित लाभ देण्यात अपयशी ठरत असल्याचे सांगितले.

शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेबाबत बोलताना माळी यांनी, सरकारवर निशाणा साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी जाहीर केली असली तरी तिच्या अंमलबजावणीबाबत स्पष्टता नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपदी राहुल पवार व तालुकाध्यक्षपदी देवदास माने यांची निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या सत्कार करण्यात आला.

Related Articles