सातारा जिल्हाहोम

महिला मर्चंट पतसंस्थेचा ४०० कोटी व्यवसाय टप्पा पार

ठेवीत १६ टक्के, कर्जवाटपात ३० टक्के वाढ; ७.३७ कोटी नफा, एनपीए शून्य टक्के कायम

कराड/प्रतिनिधी : – 

पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात भक्कम स्थान निर्माण केलेल्या महिला मर्चंट नागरी सहकारी पतसंस्था मर्या., कराडने आर्थिक प्रगतीचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठत ४०० कोटी रुपयांच्या व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. संस्थेच्या सातत्यपूर्ण पारदर्शक कारभारामुळे आणि सभासदकेंद्रित धोरणांमुळे ही उल्लेखनीय कामगिरी साध्य झाली आहे.

मर्चंट ग्रुपचे अध्यक्ष सत्यनारायण मिणीयार यांच्या नेतृत्वाखाली आणि संस्थापक सौ. भारती मिणीयार यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था गतिमान वाटचाल करत आहे. नुकत्याच संपलेल्या ३१ मार्च २०२६ अखेरच्या आर्थिक वर्षात संस्थेने सर्वच आर्थिक निर्देशांकांमध्ये लक्षणीय वाढ नोंदवली आहे.

संस्थेच्या ठेवीत १६ टक्क्यांची वाढ होऊन त्या २३९ कोटी रुपयांवर पोहोचल्या आहेत, तर कर्जवाटपात तब्बल ३० टक्क्यांची वाढ होऊन कर्जे १७० कोटी रुपयांपर्यंत गेली आहेत. एकूण व्यवसाय ४०९ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असून संस्थेने ७ कोटी ३७ लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. विशेष म्हणजे, नेट एनपीए शून्य टक्के राखण्यात संस्थेला यश आले आहे, ही बाब संस्थेच्या आर्थिक शिस्तीची साक्ष देणारी ठरते.

संस्थेची सभासदसंख्या २१ हजार ५०० च्या पुढे गेली असून, वसुल भागभांडवल १२ कोटी ५० लाख रुपये आहे. गुंतवणूक १२९ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असून एकूण निधी ३८ कोटी रुपयांवर स्थिरावला आहे. याशिवाय, कराड मर्चंट व महिला मर्चंट या संलग्न संस्थांचा एकत्रित व्यवसाय १५०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याची माहिती संस्थापक सौ. भारती मिणीयार यांनी दिली.

संस्थेचे मुख्यालयासह एकूण ११ शाखांचे जाळे कार्यरत असून, त्यापैकी ७ शाखा स्वमालकीच्या इमारतीत कार्यरत आहेत. वारूंजी शाखा लवकरच नव्या वास्तूत स्थलांतरित होणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. संस्थेची प्रगती ही केवळ आकडेवारीपुरती मर्यादित नसून गुणवत्तेवर आधारित असल्याचे प्रतिपादन चेअरमन सौ. कविता पवार यांनी केले.

तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत संस्थेने सर्व शाखा संगणकीकृत केल्या असून सीबीएस प्रणालीचा अवलंब केला आहे. ग्राहकांना मोबाईल बँकिंग, आरटीजीएस, एनईएफटी, आयएमपीएस, मोबाईल अॅप, मोबाईल रिचार्ज, एसएमएस सेवा, तसेच आधुनिक लॉकर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या सेवेत सुलभता आणि वेग वाढला आहे.

यावेळी व्हाइस चेअरमन सौ. सुवर्णा सादिगले, संचालक मंडळ, व्यवस्थापक, तसेच अधिकारी उपस्थित होते. संस्थेच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या सर्व सभासद, खातेदार, ऑडिटर आणि कर्मचारी वर्गाचे आभार व्हाइस चेअरमन सौ. सुवर्णा सादिगले यांनी व्यक्त केले.

Related Articles